जनता पुरात, सेल्फी घेत गिरीश महाजन पूर पर्यटनात

पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नाही.  

Updated: Aug 9, 2019, 12:20 PM IST
जनता पुरात, सेल्फी घेत गिरीश महाजन पूर पर्यटनात title=

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नाही. अनेकजण पुरात अडकले आहेत. सरकारकडून मदतीसाठी दिरंगाई होत असल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पूर पर्यटनात दिसले. पुरात बोटीने पाहणी करताना चक्क ते टीमसोबत सेल्फी घेताना दिसत होते. बचाव कार्यात महाजनांसोबतच्या कार्यकर्त्यांना सेल्फीचा सोस आवरता आला नाही. जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना यांना सेल्फीचा का सोस पडला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पूरस्थितीचा आढवा घेण्यासाठी बोटीतून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या सोबत एसपी होते. ते मंत्र्यांसोबत सेल्फी घेत होते. यावेळी गिरीश महाजन उपस्थितांना हात दाखवत होते. जनता पुरात अडकली आहे. मंत्री महोदयांना असे करता तुम्हाला काहीही वाटत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.  कोल्हापूर, सांगलीत पुरानं थैमान घातले आहे. २७ जणांचा जीव या पुरानं घेतला आहे. हजारो लोक या पुरात अडकले आहेत. त्यांचे संसार उध्वस्त झालेत.

अनेक जण जीव मुठीत घेऊन मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजनांचा सेल्फीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गिरीश महाजन पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बोटीत बसून पुराची पाहणी करताना दिसत आहेत. कोल्हापूरचे एसपी अभिनव देशमुख हे सेल्फी घेत आहेत. त्यामध्ये गिरीश महाजन हसत हात हलवताना दिसत आहे. पूरस्थिती गंभीर असताना महाजनांच्या  व्हिडिओमुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये पावसाने घातलेल्या थैमानानंतर मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या चार दिवसांपासून अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ट्रक आणि कंटेनर ड्रायव्हर,क्लिनर हे अडकून पडलेत. महामार्गावर रस्त्याचा बाजूला या लोकांना आपली वाहने उभी करून थांबावे लागत आहे. ना खायला अन्न ना पिण्यासाठी पाणी, त्यामुळे या सगळ्यांचे हाल होत आहेत.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेवाडी या गावातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. तिथल्या लोकांना भेटून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी पूरपरिस्थितीच्या पाहाणीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर लागणाऱ्या औषधांचा कोणताही तुटवडा जाणवणार नसल्याचं झी २४ तासशी बोलताना सांगितले.