Narayan Rane Slams Sanjay Raut: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील तू-तू मैं-मैं कायमच चर्चेत असते. या वादामध्ये रविवारी राणेंनी केलेल्या आणखीन एका विधानाची भर पडली. राऊत यांचं निवासस्थान असलेल्या भांडूपमधील एका भाषणात राणेंनी राऊतांना खासदार करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या सांगण्यावरुन मीच पैसा खर्च केलेला. राऊत खासदार होणं हे माझं पाप आहे, असा टोला लगावला आहे. भांडूपमध्ये आयोजित कोकण महोत्सवामध्ये राणे बोलत होते. राऊतांचं निवासस्थान भांडूपमध्ये असल्याच्या मुद्द्याच्या धागा पकडत राणेंनी ही टीका केली.
राऊत यांना खासदार कशाप्रकारे केलं आणि त्यामध्ये आपली काय भूमिका होती याबद्दल राणेंनी सविस्तरपणे भाष्य केलं. आपल्या भाषणात राणेंनी, "संजय राऊत खासदार होणं हे माझं पाप आहे. एकदा बाळासाहेबांनी मला बोलवलं. मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा संजय राऊत तिथेच होते. या संजय राऊतला आपल्याला खासदार करायचं आहे असं बाळासाहेब म्हणाले. मी बाळासाहेबांचा कोणताच शब्द खाली पडू देत नसे. त्यामुळेच मी राऊतांना खासदार करेन असं म्हटलं," असं सांगितलं.
पुढे राऊतांनी, "दुसऱ्या दिवशी मी राऊतांना खासदारकीसाठीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात बोलावलं. मी राऊतांना बोलावलं आणि त्यांच्याकडे कागदपत्रं मागितली. दुसरीकडे 'शिवालय'मध्ये उद्धव ठाकरेंनी राऊतांविरोधात दुसरा उमेदवार आणून बसवलेला. पण मला बाळासाहेबांनी राऊतांचं नाव सांगितलं होतं. राऊत तेव्हा खासदार बनायला निघाले पण तेव्हा निवडणूक यादीतही त्याचे नाव नव्हते. मी याबद्दल विचारलं असता ते गप्प बसले. तरीही मी त्यांना फॉर्म भरायला सांगितला," अशी आठवण सांगितली.
"दुसऱ्या दिवशी उमेदवार अर्जांची पडताळणी होती. मी त्यांच्याबरोबर गेलो होतो. तेव्हा काँग्रेसच्या रोहिदास पाटलांनी हात वर करुन राऊतांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला. त्यावेळी मीच पाटलांना म्हटलो की दाजी माझा माणूस आहे, खाली बसा. माझं ऐकून पाटील खाली बसले. त्यामुळे राऊतांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. निवडणूक यादीत संजय राऊतांचं नाव नसतानाही मी त्यांचा उमेदवारी अर्ज पास करवून घेतला होता," असं राणेंनी सांगितलं.
"राऊतांना खासदार करण्यासाठी मी पैसा खर्च केला. आज मी रक्कम सांगणार नाही. मात्र माझे उपकार असूनही राऊत आज माझ्यावर टीका करतात. आता त्यांची बाहेर राहण्याची पात्रता नसून राऊतांनी तुरुंगातच गेलं पाहिजे. त्यांनी इतकी हेराफेरी केली आहे की लवकरच ते पुन्हा तुरुंगात जातील," असं राणे म्हणाले. राणेंच्या या टीकेला राऊत काय उत्तर देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.