कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील स्मशानभूमी बंद ठेवण्यात आलीय. सुरक्षेसाठी स्मशानभूमीला कुलूप ठोकण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. मोदी कल्याणमध्ये असेपर्यंत एकही अंत्ययात्रा लालचौकी स्मशानभूमीत येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिलेत. त्याचबरोबर फडके मैदानाशेजारी असणाऱ्या वाधवा हॉलमधील तीन पूर्वनियोजित विवाहदेखील तडकाफडकी रद्द करण्यात आलेत.
पंतप्रधानांच्या सोईसाठी ही व्यवस्था करण्यात आली असली तरी ती नागरिकांसाठी गैरसोय ठरतेय, असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई-कल्याण दौऱ्यावर आहेत. मेट्रोचे दोन टप्पे आणि घरकुल योजनेच्या ४१००० कोटी रूपयांच्या प्रकल्पांचं भूमीपूजन ते करणार आहेत. मुंबईत पोहोचल्यावर लगेच एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. त्यानंतर 'टाईमलेस लक्ष्मण' या पुस्तकांचं प्रकाशन राजभवनावर करतील. त्यानंतर पंतप्रधान दुपारी बहुचर्चित कल्याण दौऱ्यावर येणार आहेत.
ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो ५ आणि दहिसर- मिरा भाईंदर मेट्रो ९ या दोन मेट्रो प्रकल्पांचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. मेट्रो प्रकल्पांसह पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतल्या घरकुल योजनेचाही शुभारंभ होईल. नवी मुंबईत सिडको १८ हजार कोटी रूपयांचा ८९,७७१ परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प साकारत आहे. या प्रचंड प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान पुण्यासाठी रवाना होतील. पुण्यात पंतप्रधानांच्या हस्ते हिंजेवाडी- शिवाजीनगर या पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पाचं भूमीपूजन होणार आहे.