योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकचं कारागृह म्हटलं की वादग्रस्त प्रतिमा समोर येते पण सध्या नाशिकच्या तुरुंगात जे चाललंय, ते फारच सुखावह आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मूर्ती बनवणारा हा सागर पवार एका गुन्ह्यासाठी तो नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगतोय. त्याने नाशिक तुरुंगाला गेल्या दोन वर्षात नवं रूप दिलंय.
स्वत:त असलेली गणेश मूर्ती बनविण्याची कला त्यानं तुरुंग अधीक्षकांना सांगितल्यानंतर अधीक्षकांनी त्याला गणेश मूर्तींचं साहित्य आणून दिलं. आता गेली दोन वर्षं अत्यंत सुबक अशा शाडूच्या गणपती या कारागृहात तयार होतायत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी सागर पवारनं चक्क दोन हजार मूर्ती तयार केल्यात.
विशेष म्हणजे पूर्णपणे हाताने बनवलेल्या आणि रंगविलेल्या मूर्तींना सागवानी आसन मोफत देण्यात येतंय. सागरने सतरा कैद्यांनाही गणेशमूर्ती तयार करण्याचं काम शिकवलंय. सागर सारखे कलाकार हेरून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा हा उत्तम श्रीगणेशाच म्हणावा लागेल.