सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : येवला इथल्या चिंचोली एमआयडीसी परिसरात झालेल्या अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरूच्या हत्येबाबत नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी महत्त्वाचा खुलासा केलाय.
अफगाणी नागरिक सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती यांची हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांच्या ड्रायव्हरनेच केल्याचं निष्पन्न झालं आहे. प्रॉपर्टी आणि पैशावरून अहमद चिस्ती यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, या हत्येबाबत इतरही काही कारण आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितलं आहे.
या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुफी धर्मगुरु यांचा ड्राइव्हर आणि इतर दोन जण फरार आहेत.
मंगळवारी सकाळी येवला इथल्या चिंचोली एमआयडीसी परिसरात एका अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हा धर्मगुरू मूळचा अफगाणिस्तान इथला असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती असं या अफगाणी सुफी धर्मगुरूचे नाव होतं.
सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती हे गेल्या 4 वर्षा पासून भारतात राहत होते . त्याच्या बरोबर त्याची पत्नी देखील भारतात राहत होती. केंद्र शासनाच्या परवानगीने रेफुजी म्हणून त्यांना भारतात रहाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यांचं स्वःतचं युट्युब चॅनेल होतं त्यात ते त्यांच्या धर्मा बद्धलची माहिती देत होते. त्यांना मोठ्या प्रमाणत फॉलोअर्स होते. त्यामुळे youtube च्या माध्यमातून त्याला मोठा पैसा मिळत होता.
त्याचबरोबर त्याला बाहेरून देखील मोठ फंडिंग होत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यांनी या ठिकाणी जमीन घेतली होती ते रेफुजी असल्या कारणामुळे त्यांना स्वतःच्या नावावर जमीन घेता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या इसमाच्या नावावर ही जमीन घेतली होती.
आणि त्याच्यातूनच हा वाद निर्माण झाला आणि त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असं पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार निष्पन्न झालं आहे. त्यांची हत्या धर्मवादातून नाही तर प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचं प्राथमिक अंदाजात समोर आलं आहे.