अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं असून आता खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सत्तास्थापणेनंतर पहिल्यांदा माजी राज्यमंत्री आणि आमदार बच्चू कडू मिडियासमोर आले असून आता आलेल्या स्थिर सरकारने शेतकरी, अनाथ, अपंग आणि वंचितांना स्थिर करावे अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासारखा अत्यंत जीव लावणारा माणूस मुख्यमंत्री झाला याची स्पष्टता, पारदर्शकता आणि भावना त्यांच्या भाषणातून दिसली असं बच्चू कडू यांनी म्हटलं. तसंच देवेंद्रजी आणि शिंदेंजी यांची जोडी अर्जुन आणि कृष्णासारखी निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी बच्चू कडू यांनी व्यक्त केल्या आहे. चांगलं आणि स्थिर सरकार निर्माण होऊन आम्ही बऱ्याच चांगल्या गोष्टी करू अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
आमदार बच्चू कडू यांनी यावेळी शिंदे गटात सामील होण्यामागचं कारणही सांगितलं. राष्ट्रवादीकडून मतदार संघात निधी मिळत नव्हता. शेवटी जनतेची कामं करताना तुमचा मतदार संघच तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार का, याबाबतही बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्यासाठी दिव्यांगाचा विषय महत्वाचा असून दिव्यांगांसाठी वेगळा विभाग बनवून त्याचा चार्च माझ्याकडे दिला तर नक्कीच चांगलं काम करु अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.