आदित्य ठाकरेंनी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण कायम

व्हायरल फोटो पाहून आदित्य यांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांना आणि यंत्रणांना आदेश देत तेथे पूल उभारण्याची सूचना केली होती

Updated: Jul 21, 2022, 05:23 PM IST
आदित्य ठाकरेंनी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण कायम title=

Aaditya Thackeray :  काही महिन्यांपूर्वी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर भागात पाणी टंचाईंचे भीषण वास्तव समोर आले होते. शेंद्री पाडा येथे लाकड्या फळीवरुन आदिवासी भागातील महिला हंडे घेऊन जातानाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी तात्काळ याची दखल घेतली होती. व्हायरल फोटो पाहून आदित्य यांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांना आणि यंत्रणांना आदेश देत तेथे पूल उभारण्याची सूचना केली होती. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या हस्ते नाशिकमधील दुर्गम भागात असणाऱ्या शेंद्रीपाडा या आदिवासींची लोकसंख्या अधिक असणाऱ्या गावामधील एका नदीवरील पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. 

मी सोशल मीडियावर या जागेचा फोटो पाहिला होता. त्यानंतर मी अधिकाऱ्यांना या गावातील समस्या सोडवण्यासंदर्भातील निर्देश दिले, असं आदित्य यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. हे निर्देश दिल्यानंतर तीन महिन्यांमध्ये आम्ही या ठिकाणी पूल बांधला आणि गावातील प्रत्येक घरात आता नळाने पाणीपुरवठा केला जातोय, असंही आदित्य यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता पाणीपुरवठा विभागाचा कारभार उघड झाला आहे. मुसळधार पावसामुळे हा लोखंडी पूल वाहून गेल्याने पाणीपुरवठा विभागाने तात्पुरती मलमपट्टी केल्याचे उघड झाले आहे.

गेले काही दिवस नाशिकसह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. याच पावसात हा लोखंडी पूल वाहून गेल्याने 
येथील महिलांना पाण्यासाठी पुन्हा एकदा जीवघेणी कसरत करावी लागत आहे. त्यानंतर आता पुन्हा येथील महिलांना पाण्यासाठी जीव धोक्यात टाकून लाकडी फळीवरुन प्रवास करावा लागत आहे. तसेच
आदिवासी भागात प्रशासनातर्फे कशा प्रकारे करण्यात येते हे उघड झाले आहे.

 

दरम्यान, आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी ते शिवसंवाद यात्रेनिमित्त कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. त्यामुळे या भागामध्ये गेल्यावर ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.