Nashik News Today: बदलापूर आणि कोलकाता येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बदलापूर आणि कोलकाता दोन्ही शहरात प्रचंड रोष उसळला आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ होत आहे. अशावेळी महिलांनीच स्वसंरक्षणाची जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे. नाशिकमध्ये माय-लेकीने टवाळखोरांना चांगलाच धडा शिकवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तसंच, या माय-लेकींचे कौतुकदेखील होत आहे.
नाशिकमध्ये 'तूच हो तुझी संरक्षक' हा मंत्र अजमावत मायलेकींनी छेड काढणाऱ्या चार टवाळांना चोप देत त्यांची मस्ती चांगलीच जिरवली आहे. शिवशक्ती चौकाजवळील डॉ. हेडगेवार चौकात बुधवारी (28 ऑगस्ट) दुपारी हा प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी चार टवाळखोरांना जेरबंद केले आहे. त्यातील एक अल्पवयीन आहे. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झालीये.
सीसीटिव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिककर महिलांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नाशिकच्या पवननगर भागातील महिला हेडगेवार चौकातील मनपा रुग्णालयात येत होती. त्या वेळी रस्त्यालगत बाकावर बसलेल्या टवाळखोरांनी या महिलेची छेड काढली. महिलेने सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, पुन्हा हा प्रकार घडल्याने तिचा संताप अनावर झाला. तिने मागे फिरून टोळक्याला विचारणा केली. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
टवाळखोर मुलं जेव्हा या महिलेची छेड काढत होती. त्याचवेळी महिलेची मुलगी व मैत्रीण पाठीमागून दुचाकीवर आल्या. टवाळखोर हे आईची छेड काढत असल्याचे पाहून लेकीने थेट टवाळखोराच्या कानशिलात लगावली. बाजूला जात असलेल्या भंगारच्या गाडीवरून खुर्ची उचलून महिलेने टवाळखोराला चांगलेच चोपून काढले. रणरागिणींचा रुद्रावतार पाहून टवाळखोरांनी तेथून पळ काढला. मात्र या घटनेने या महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिक पाठोपाठ दादरमध्येही अशीच एक घटना घडली होती. 15 वर्षीय मुलीचा पाठलाग करणाऱ्या आरोपीला आईने पकडून दिले आहे. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी दररोज तिच्या शाळेतून दादर ते वरळी नाका या मार्गावर बसने प्रवास करते. गेल्या चार दिवसांपासून आरोपी तिचा पाठलाग करत होता. आरोपी नेहमी बस थांब्याजवळ पाळत ठेवत होता. मुलीच्या आईला लक्षात आल्यानंतर तिने आरोपीला पकडून दिले आहे.