सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchvati Police) हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची निर्घृण हत्या झाली. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. 20 तारखेला मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या केली. पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत तरुणाचं नाव गगन कोकाटे असल्याचं समोर आलं. सकाळी काही लोकांना गगनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. ही घटा पंचवटी पोलिसांना कळवण्यात आली.
गगनच्या खिशात सापडली चिठ्ठी
घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तपास सुर केला. गगनच्या खिशातून पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली. यावरुन प्रेमप्रकरणातून गगनची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला. मृत गगनचे वडिल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोकाटे हे काही दिवसांपूर्वीच पोलीस सेवेतून निवृत्त झाले. गगन हा त्यांचा धाकटा मुलगा होता. गगनच्या मृत्यूने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
असा झाला खुलासा
गगनच्या खिशातून मिळालेल्या त्या चिठ्ठिवरुन पोलिसांनी तपास सुरु केला आणि याप्रकरणी नाशिकमधल्या एका शाळेतील शिक्षिकेला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसी खाक्या दाखवताच या शिक्षिकेने आपण सुपारी देऊन गगनची हत्या केल्याची कबुली दिली. धक्कादायक म्हणजे गगनची हत्या करण्यासाठी तीने आपल्याच विद्यार्थ्यांना 2 लाख रुपयांची सुपारी दिली होती. अनैतिक संबंधातून झालेल्या वादात ही हत्या घडवून आणण्यात आली.
काय आहे नेमकी घटना
आरोपी महिला शिक्षकेचं नाव भावना कदम असं असून नाशिकमधल्या एका शाळेत ती भूगोल हा विषय शिकवते. म्हसरुळच्या मेरी कपांऊंडमध्ये राहाणाऱ्या पंचवीस वर्षांच्या गगन कोकाटेशी तिची ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरु झालं. आरोपी भावना कदम ही घरी ट्यूशनही घेतली होती. यासाठी गगन तिला विद्यार्थी मिळवून देण्यास मदत करायचा. तीन वर्ष भावना आणि गगनचं प्रेमप्रकरण सुरु होतं. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु झाले होते. कधी आर्थिक तर कधी कौटुंबिक कारणावरुन त्यांच्यातला वाद विकोपाला जात होता.
भावनावरच्या रागातून गगन तिचा पती आणि दोन मुलांनाही त्रास देऊ लागला होता. त्यामुळे आरोपी भावनाने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. यासाठी तीने शाळेतल्या विश्वातील दोन विद्यार्थ्यांना हत्येची सुपारी दिली. यासाठी दोन लाख रुपये देण्याचं ठरलं. यातले एक लाख रुपये तीने आधी दिले, तर हत्येनंतर एक लाख रुपये देण्याचं ठरलं.
रात्रीच्या सुमारात विद्यार्थ्यांनी गगनला रस्त्यात गाठलं आणि त्याच्या डोक्यात तिक्ष्ण हत्याराने वार करत त्याची हत्या केली. ज्या वेळी हत्या झाली त्यावेळी भावना कदमही त्या ठिकाणी उपस्थित होती. त्यानंतर सकाळी जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळेस देखील भावना कदम तिकडे पोहोचली आणि गगन मृत झालाय याची खात्री करुन घेतली. पण गगनच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठिमुळे सर्व कट उघडकीस आला. पंचवटी पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपींना अटक केली.