कोल्हापूर : आज घटस्थापना. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात झाली. नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात. दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागतात. देवीची साडेतीन पिठं भक्तांनी फुलून जातात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं भाविकांसाठी बंद आहेत. त्यामुळे शारदीय नवरात्रोत्स यंदा भक्तांशिवाय साजरा केला जाणार आहे. मंदिरांध्ये मात्र विधीवत पूजा कऱण्यात येणार आहे.
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील देवीची विधीवत पूजा बांधली जाते. खरतर आदिशक्तीची विविध रूपं पाहण्यासाठी अंबाबाई मंदिरात भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात. पण मंदिर बंद असल्यामुळे भक्तांना देवीच थेट दर्शन करता येणार नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना देवीच दर्शन करता यावं यासाठी ऑनलाइन दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे हे मंदिर पूर्णपणे उजळून निघला आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये मंदिरावर अशाच पद्धतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. यावर्षी भक्तांना मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेता येणार नाही, तरी देखील नवरात्रीचा उत्साह कोणत्याही प्रकारे कमी होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने खबरदारी घेतली आहे.