Ajit Pawar ask Supriya Sule to Quiet: शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) अध्यक्षपद सोडणार असल्याचं जाहीर केल्यानंतर सर्व नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. दरम्यान सभागृहात जेव्हा कार्यकर्ते सुप्रिया सुळेंनी बोलावं अशी विनंती करु लागले, तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना बोलू नको असा सल्ला दिला. यावर गोंधळ घातला असता त्यांनी कार्यकर्त्यांना झापलं.
"मी आता निवडणुकीला उभा राहणार नाही. यापुढे देशाच्या, राज्याच्या प्रश्नात लक्ष घालणार. याशिवाय इतर कोणतीही जबाबदारी घेणार नाही. इतकी वर्षं संधी झाल्यानंतर कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतला आहे," अशी घोषणा शरद पवारांनी यावेळी केली.
यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पक्षाच्या सर्व नेतेही यावेळी भावूक झाले. जयंत पाटील यांना तर अश्रू अनावर झाले होते. मात्र यादरम्यान अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचं समर्थन करत पक्षाच्या कार्यकर्त्यांना झापलं. दरम्यान, यावेळी कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांनी बोलावं अशी विनंती करु लागले. मात्र सुप्रिया सुळे बोलण्यास नकार देत होत्या. यावेळी अजित पवारांनी माईक उचलला आणि सुप्रिया तू बोलू नको असं म्हटलं. यावेळी काहींनी गोंधळ घातला असता 'तिचा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतोय. गप्प बसा बाकीचे' असं खडसावलं.
दरम्यान अजित पवारांनी विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं. "सगळ्यांच्या भावना शरद पवारांनी पाहिल्या आहेत. शरद पवार अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाही असं नाही. शरद पवारांच्या वयाचा विचार करता एका नव्या नेतृत्वाकडे आपण जबाबदारी देण्याचा विचार करत आहोत. शरद पवार परिवाराचे प्रमुख म्हणूनच काम करणार आहेत. त्याबद्दल शंका असण्याची गरज नाही. उगाच तेच तेच सांगू नका. पण काळानुरुप काही निर्णय घ्यावे लागतात. आता साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको रे? मला तुमचं काय कळत नाही. ," असं अजित पवारांनी खडसावलं आहे.