भाजप-शिंदे गटाला पवारांची साथ, पोस्टर तो झांकी है, और क्या बाकी है?

जळगावमध्ये चक्क भाजप, शिवसेना शिंदे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केलीय. इतकंच नाही तर भाजप शिवसेनेच्या पोस्टरवर अजित पवारांच्या फोटोमुळे चर्चेला उधाण आलं आहे

Updated: Apr 20, 2023, 10:18 PM IST
भाजप-शिंदे गटाला पवारांची साथ, पोस्टर तो झांकी है, और क्या बाकी है? title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : गेल्या काही दिवसापासून अजित पवार (Ajit Pawar) भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादीमध्ये (NCP) असल्याचे म्हणत अजित पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. पण आता पक्षाच्या शिबिर पत्रिकेतून अजित पवारांचं नाव गायब झाल्याने पुन्हा अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता जळगावातील धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या (BJP-Shivsena) पोस्टरवर अजित पवारांचा फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. 

राष्ट्रवादीतली गटबाजी चव्हाट्यावर
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर आली असून राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवारांचे निकटवर्तीय संजय पवार (Sanjay Pawar) यांनी भाजप-शिवसेने सोबत युती केली आहे. विशेष म्हणजे युतीच्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत अजित पवारांचा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.  संजय पवारांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी याप्रकरणी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करून संजय पवारांवर कारवाईची मागणी केली आहे. 

'म्हणून भाजप-शिवसेनेसोबत गेलो'
सहकारात वीस टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण असते त्यामुळे सहकारात काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने त्यांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील नेते कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला असून सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण नसून चांगली माणसं एकत्रित यायला पाहिजे त्यामुळे भाजप शिवसेनेसोबत गेल्याचे संजय पवार यांनी सांगितलं.

पोस्टरवर अजित पवारांचा फोटो
संजय पवार हे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत.  संजय पवार यांचा गट भाजप शिवसेनेच्या पॅनलमध्ये बाजार समितीची निवडणूक लढवत असल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पोस्टरवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारांच्या फोटोला स्थान दिल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.  सहकारात पक्ष पाहिला जात नाही. त्यामुळे स्वाभाविक कुठल्याही पक्षाचे चांगले लोक एकत्र येऊन ही निवडणूक लढवतात आणि याच कारणाने संजय पवार यांनी भाजप शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार सुरेश भोळे यांनी स्पष्ट केलं.

सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत करण्यासाठी एकीकडं प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडं स्थानिक राजकारणात छुप्या युती आणि आघाडींचा खेळ सुरू झालाय.. राष्ट्रवादी नेतृत्व अशा खेळाला चाप लावणार की, भविष्यातील राजकारणाची ही नांदी ठरणार, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.