Sharad Pawar Emotional Video: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते अजित पवार हे आपल्या जवळच्या आमदारांना घेऊन शिवसेना, भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले. शरद पवारांचं वय झालं,आता त्यांनी थांबावं, असा सल्ला अजित पवार यांनी काका शरद पवार यांना दिला. दुसरीकडे आपण 83 नव्हे तर 93 वर्षांपर्यंत लढू असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. एवढं बोलूनच न थांबता त्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात देखील केली आहे. आजच्या घडीला राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांची सोबत अजित पवार यांना असली तरी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याचा विश्वास शरद पवार यांना आहे. याचीच प्रचिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओत शरद पवार आपल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाची आपुलकीने विचारपूस करतायत. कार्यकर्त्याच्या घरचे देखील पवारांना तब्येतीची काळजी घेण्यासाठी सांगतात. हा भावनिक व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्याच्य कडा ओल्या झाल्या आहेत.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. ते शरद पवारांसह गाडीतून प्रवास करतायत. त्यावेळी त्यांनी आंबेगाव तालुक्यातील ताराबाई हरिभाऊ निघोट यांच्याशी व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल संवाद साधला.
हॅलो पवार साहेब नमस्कार, आम्ही आहे तुमच्या पाठीशी काही घाबरु नका, असे त्या शरद पवार यांना म्हणताना दिसत आहेत.
हा मातामाऊलींचा विश्वास आदरणीय शरद पवार साहेबांवर.. “ आता आणखी ठणठणीत झालोय” हे साहेबांचं वाक्य अनेकांना उमेद देणारं आहे! उमेद संघर्षाची, तत्वांसाठी लढण्याची!
आंबेगाव तालुक्यातील ताराबाई हरिभाऊ निघोट यांच्यासोबत पवार साहेबांची ही बातचीत ऊर्जा देणारी आहे.#लढायचंय_जिंकायचय… pic.twitter.com/2lHGMiRqnf— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 8, 2023
यानंतर 'आपण एकत्र आहोत आणि राहू, तुम्ही तब्येत संभाळा' असे शरद पवार त्यांना म्हणाले. सगळं व्यवस्थित असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
'आमची अनिता बारामतीला शिकायला होती. तिचं चांगल शिक्षण दिलंत. सभापती केली. आता चांगली नोकरीला लागली', असं म्हणत ताराबाईंनी शरद पवार यांचे आभार मानले.
दरम्यान घरातील छोटं बाळ 'पवार बाबा','पवार बाबा की जय' म्हणून त्यांना हाक मारु लागलं.
राज्यातील असे लाखो कार्यकर्ते ही शरद पवारांची सध्याची ताकद आहे. यातूनच त्यांना लढण्याची उर्जा मिळतेय. या व्हिडीओखाली यूजर्सनी देखील 'पवार साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत,' अशी कमेंट केली आहे.