'तुम्हाला एकच मुलगी का? मुलगा का नाही?', शरद पवारांचं उत्तर वाचून तुमची मान अभिमानाने उंचावेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांचा राजकीय वारसा त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर असून, त्या सक्षमपणे पेलताना दिसत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Dec 12, 2023, 12:38 PM IST
'तुम्हाला एकच मुलगी का? मुलगा का नाही?', शरद पवारांचं उत्तर वाचून तुमची मान अभिमानाने उंचावेल title=

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांचा राजकीय वारसा त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर असून, त्या सक्षमपणे पेलताना दिसत आहेत. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना राजकारणाचे धडे दिले असून, त्यादेखील प्रत्येक प्रसंगात वडिलांच्या खांद्याला खांदा लावून भक्कमपणे पाठीशी उभे असतात. आपला वारसा पुढे कायम राहावा यासाठी मुलाचा विचार करणाऱ्या काळात शरद पवार यांनी मात्र एकाच मुलीवर सुख मानलं होतं. पण त्यांनी असा निर्णय घेण्यामागे सामाजिक प्रबोधनही होतं. शऱद पवारांनी दूरदर्शना दिलेल्या एका मुलाखतीत आपल्याला एकच मुलगी का? या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. 

मुलगा हवाच याचा हट्ट असताना तुम्हाला एकच मुलगी कशी काय? असा प्रश्न तुम्हाला लोक विचारत असतील. मग त्यावर तुम्ही काय उत्तर देता असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. यावर शरद पवारांनी सांगितलं होतं की, "या प्रश्नाला मला अनेकदा उत्तर द्यावं लागतं. खेड्यापाड्यात गेल्यानंतर लोक मुलगा असता तर बरं झालं असं म्हणतात. शेवटी नाव चालवायला घरात कोणीतरी पाहिजे किंवा बरं वाईट झालं तर अग्नी देण्यासाठी पाहिजे. मुलानेच अग्नी दिला तर स्वर्गाचा रस्ता खुला होतो असंही अनेकजण सांगायचे". 

"पण हा प्रत्येकाचा पाहायचा दृष्टीकोन आहे. मला असं वाटतं अग्नी देण्यासाठी कोण असणार याची चिंता करायची की जिवंत असताना नीट नेटकं वागणाऱ्याची चिंता करायची. मुलगा आणि मुलीकडे पाहण्याचा भारतीय समाजव्यवस्थेचा जो दृष्टीकोन आहे तो बदलण्याची गरज आहे.," असंही शरद पवारांनी सांगितलं होतं. 

"मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून, समान वागणूक देऊन, आत्मविश्वास वाढवून तिच्याकडून उत्तम प्रकारचं काम करुन घेऊ शकतो. व्यक्तिमत्व फुलवो शकतो याची मला खात्री आहे," असा विश्वास शरद पवारांनी त्यावेळी व्यक्त केला होता. स्त्रीला संधी मिळाली तर ती उत्तम प्रकारचं कर्तृत्व दाखवू शकते असा विश्वास शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवला होता.

विशेष म्हणजे शरद पवारांनी यावेळी सुप्रिया सुळेंना राजकारणात रस नसून त्यांची येण्याची इच्छाही नसल्याचं म्हटलं होतं. मुलगी कर्तृत्व दाखेल असं जर आपल्याला पटत असेल तर मुलाचा हव्यास करण्याची गरज नाही असं शरद पवारांचं म्हणणं आहे.

"आम्ही सतत सगळ्या देशाला, महाराष्ट्राला कुटुंब नियोजन करा म्हणून मार्गदर्शन करत राहणार आणि आपल्या घऱात भरपूर गर्दी योग्य दिसणार नाही. कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आपण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत इतर जणही थांबण्याचा विचार करत नाहीत. त्याचदृष्टीने मुलीवरच समाधान मानण्याची भूमिका मी आणि पत्नीने घेतली," असा उलगडा शरद पवारांनी केला होता.