Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या चर्चा आणि या चर्चांना दुजोरा देणाऱ्या काही घडामोडी पाहता आता यावर खुद्द शरद पवार यांनीच पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवार यांनी काही गोष्टी अधिकच स्पष्ट करत अजित पवार पक्षाचच काम करत आहेत, असं म्हटलं. सध्या पक्षाची कोणतीही बैठक बोलावलेली नाही, असं म्हणताना त्यांनी तुमच्या मनातील चर्चा आमच्या मनात नाही आणि या चर्चेचा अजिबात अर्थ नाही ही भूमिका मांडली.
'जी चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या कुणाच्याच मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्वं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल मी सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे सर्व सहकारी एकाच विचारानं पक्षाला शक्तिशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. याव्यतिक्त दुसरा कुठचाही विचार कोणाच्या मनात नाही', असं शरद पवार म्हणाले.
पक्षातील सहकाऱ्यांच्या भूमिकांबद्दल विचारलं असता मंगळवारी पक्षाची कोणतीही बैठक नसून, आपणही देहू येथील कार्यक्रमानंतर मुंबईला मुक्कामी जाणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. पक्षातील सहकारी असं म्हणताहेत... या आशयाचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच 'मी काय म्हणतो ते अधिक महत्त्वाचं आहे' अशा किमान शब्दांत त्यांनी सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली.
अजित पवार यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना वारंवार होणाऱ्या चर्चांबाबत काहीशी संतप्त प्रतिक्रिया देत आपण कुणाला उत्तरं द्यायला बांधिल नसल्याचं स्पष्ट केलं होतं. बावनकुळे यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजीही त्यांनी यावेळी व्यक्त करत नव्या राजकीय समीकरणांमध्ये तथ्य नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला. इतकंच नव्हे तर शरद पवार यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीसाठीही अजित पवार जाणार असल्याची माहिती समोर आली.