'कदातिच माझ्याकडून निवडणुकीची...', मोदी सरकारने Z+ सुरक्षा दिल्यानंतर शरद पवारांना वेगळाच संशय

Sharad Pawar on Z Plus Security: केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांना अती महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 22, 2024, 08:16 PM IST
'कदातिच माझ्याकडून निवडणुकीची...', मोदी सरकारने Z+ सुरक्षा दिल्यानंतर शरद पवारांना वेगळाच संशय title=

Sharad Pawar on Z Plus Security: केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांना अती महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याला निलेश राणे यांनी विरोध केला आहे. दरम्यान शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना वेगळाच संशय व्यक्त केला आहे. कदाचित आपल्याकडून खरी माहिती काढून घेण्याचा हा प्रयत्न असावा असं ते नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. 

"सुरक्षा वाढवण्यासंदर्भात मला काही माहिती नाही. काल माझ्याकडे केंद्रीय गृहखात्याचे अधिकारी आले होते. 3 लोकांसाठी झेड सिक्युरिटीचा निर्णय केंद्राने घेतला आहे असं मला सांगितलं. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत, देशाचे गृहमंत्री आणि तिसरं नाव माझं आहे," अशी माहिती त्यांनी दिली. 

पुढे ते म्हणाले की, "हे कशासाठी हे मला माहिती आहे. कदाचित निवडणुका आहेत. एकंदरीत पाहिलं तर खरी माहिती मिळवण्याची ही व्यवस्था असू शकते. नक्की काय ते मला माहिती नाही. गृह मंत्रालयात जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर पुढे काय करायचं ते ठरवणार आहे".

शरद पवारांची सुरक्षा का वाढवली?

गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) शरद पवारांना अधिक भक्कम सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिलेत. 83 वर्षीय शरद पवार यांच्या भोवती सुरक्षेचं कडं अधिक मजबूत केलं जाणार असून त्यांच्या सुरक्षेत 55 सशस्त्र सीआरपीएफ जवानांची टीम नियुक्त केली जाणार आहे. केंद्रातील एजन्सींनी केलेल्या धोका मूल्यांकनाच्या आढाव्यानुसार पवारांना मजबूत सुरक्षा कवच देण्याची शिफारस करण्यात आली होती. याचसंदर्भात सीआरपीएफच्या टीमने शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पवारांची सुरक्षा वाढवण्यावर एकमत झाल्यानंतर सुरक्षा वाढवली आहे. सीआरपीएफची एक टीम महाराष्ट्रात या कामासाठी आधीच दाखल झाली आहे.

राज्यात सुरु असलेल्या विविध घडामोडींमुळे पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी सायंकाळी शरद पवार यांच्याशी केंद्र सरकारच्या वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी शरद पवारांना सुरक्षा कशी आणि कशासाठी वाढवली जात आहे यासंदर्भातील कल्पना दिली. 

निलेश राणेंचा आक्षेप

"शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, 55 सीआरपीएफ जवान त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे? बातमी वाचली आणि वाटलं की ५० वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय?" असा खोचक सवाल निलेश राणेंनी विचारला आहे.