Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवर बसून चिरंजीव खासदार चालवतायेत राज्य, व्हायरल फोटो मागचं सत्य काय...

Political news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. हा आरोप करताना त्यांनी एक फोटो जारी केला आहे.  

Updated: Sep 23, 2022, 02:17 PM IST
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवर बसून चिरंजीव खासदार चालवतायेत राज्य, व्हायरल फोटो मागचं सत्य काय... title=

 मुंबई : NCP serious allegations against Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. (Political news) हा आरोप करताना त्यांनी एक फोटो जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून राज्य चालवत आहेत, असा राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला आहे. याबाबत एक फोटो राष्ट्रवादीचे पदाधिकारी रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी ट्विट केला आहे.

मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यामुळे त्यांनी जबाबदारी त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना दिली आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. आपल्या चिरंजीवांना सरकार चालवण्यासाठी पुढे केलं आहे का, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे. हा कोणता राजधर्म आहे, असा कसा हा धर्मवीर? असं ट्विट राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रविकांत वरपे यांनी केले आहे. वरपे यांनी केलेला फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान, सत्ताधारी शिंदे गटाकडून आरोपानंतर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच या फोटोबाबत 'झी 24 तास'ने खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा फोटो मॉर्फ केलाय का, याबाबत कोणतीही पुष्टी होऊ शकलेली नाही. श्रीकांत शिंदे हे ज्या खुर्चीत बसलेले दिसून येत आहेत त्यांच्या पाठिमागे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असा फलक दिसून येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

श्रीकांत शिंदे यांच्याकडून 'फोटो'बाबत स्पष्टीकरण

जो फोटो व्हायरल होत आहे. तो माझ्या कार्यालयातील आहे. यापाठिमागे कोणतेही हेतू नाही. अनावधाने 'मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन' हा फलक येथे आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हे राज्याचे आहेत. ते कुठूनही काम करु शकतात. ते पत्रकार परिषद घेणार होते. त्यामुळे त्याची पूर्व तयारी म्हणून हा फलक होता. मुख्ममंत्री हे काम करण्यात सक्षम आहेत. ते 18 ते 20 तास करत असतात. त्यामुळे करण्यात आलेला आरोप चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण स्वत: खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.

दसरा मेळाव्यासंदर्भात पुन्हा सुनावणी  

ठाकरे गटातर्फे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी याचिका दाखल करण्यात आलीय. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी आहे. काल मध्यस्थ म्हणून शिंदे गटातर्फे सदा सरवणकर यांनी याचिका दाखल केली आहे. मात्र दोन्ही गटांना महानगरपालिकेने शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याकरिता परवानगी नाकारली आहे, अशी माहिती मुंबई मनपाने काल कोर्टात दिली. दसरा मेळाव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असा पोलिसांचा अहवाल आहे. त्यामुळे काही तांत्रिक बदल करत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे .आज शिंदे गट , ठाकरे गट आणि महापालिका या तिघांच्या बाजूचा युक्तिवाद होणार. दुपारी 12 च्या दरम्यान सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. 

मुंबईत परवानगी मिळण्याची शक्यता धूसर

दसरा मेळाव्याला मुंबईत कोणालाही कुठेही परवानगी मिळण्याची शक्यता धूसर असल्याचं दिसतंय. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस परवानगी न देण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कवरून दोन्ही गटात आधीच वाद कोर्टात पोहोचलाय. इतर ठिकाणी परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी दोन्ही गटांना पोलीस दोन्ही गटांना परवानगी न देण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्याच्या ठिकाणी सुरक्षा दिली जाऊ शकते, मात्र सभास्थळी पोहचण्यापर्यंत रस्त्यात दोन्ही गट एकमेकांसमोर येऊ शकतात . एकाच गटातून दोन्ही गट निर्माण झाले आहेत त्यामुळे प्रत्येक विभागात दोन गट आहेत आणि त्यामुळेच मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचताना वाद विवाद होऊ शकतो. याचा प्रत्यय गणपती विसर्जन मिरवणुकीत दादरला आला आहे. त्यामुळे पोलीस कोणालाच परवानगी देण्याच्या मनस्थितीत नाहीत अशी माहिती आहे. 

ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा प्लॅन बी तयार

कोर्टाकडून परवानगी मिळाली तर ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा प्लॅन बी तयार झालाय.  महालक्ष्मी रेसकोर्स, गिरगाव चौपाटी, शिवसेना भवन, गोरेगावचं नेस्को सेंटरसह अनेक पर्याय आहे. ठाकरे गट कोर्ट निकालानंतरच पत्ते खोलणार असल्याचं समजतंय. ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार की नाही? यावर  मुंबई हायकोर्ट निर्णय देणार आहे. मात्र, ठाकरे गटाने  कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्लॅन बी तयार ठेवला आहे.