'पोलीस म्हणाले साहेब आम्ही फायरिंग कऱणार होतो, पण...,' हल्ल्यानंतर आव्हाडांनी सांगितला घटनाक्रम, 'चार रिव्हॉल्वर...'

Jitendra Awhad on Car Attack: मी पोलिसांना तुम्ही गाडीतून का उतरला नाहीत अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून फायरिंग केलं नाही. नाहीतर फायरिंग करु शकलो असतो असं सांगितलं असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.  

शिवराज यादव | Updated: Aug 1, 2024, 06:34 PM IST
'पोलीस म्हणाले साहेब आम्ही फायरिंग कऱणार होतो, पण...,' हल्ल्यानंतर आव्हाडांनी सांगितला घटनाक्रम, 'चार रिव्हॉल्वर...' title=

Jitendra Awhad Car Attack: स्वराज्य संघटनेने (Swarajya Sanghatna) गाडीवर हल्ला केल्यानंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संताप व्यक्त केला असून मी मेलो तरी माफी मागणार नाही असं म्हटलं आहे.  वडील खासदार झाले म्हणून तुम्ही जळत आहात अशा शब्दांत त्यांनी संभाजीराजे छत्रपतींवर निशाणा साधला आहे. तसंच मी पोलिसांना तुम्ही गाडीतून का उतरला नाहीत अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून फायरिंग केलं नाही. नाहीतर फायरिंग करु शकलो असतो असं सांगितलं असा दावा त्यांनी केला आहे. हल्ल्यानंतर निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

"ही विचारांची लढाई आहे. तुम्ही ज्या विचारांवर जात आहात ते शाहू महाराजांचे नाहीत, तुमच्या वडिलांचेही नाहीत. मी तर पुढे बसलो  होतो. गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला. आम्ही पुढे जाऊन थांबलो होतो, पण तोतपर्यंत हे उलटे फिरले. तीनच मुलं होती, पोलिसांकडे चार रिव्हॉल्वर आणि 24 गोळ्या होत्या. या असल्या भ्याड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता स्वभावात फरक पडणार नाही. मुस्लिमांसाठी मी लढत नसतो, मी विषयावर लढतो," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. 

"शाहू महाराजांनी सामाजिक एकता जपली होती, ती या घराण्याने जपायला हवी होती. बोलला बाहुला म्हणून बोलला आणि सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली. याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला आणि हवं ते काम करुन टाकलं. गाडीवर दगड मारला म्हणून बोलणार नाही असं वाटत असेल. पण आता अजून त्वेषाने, आक्रमकतेने बोलेन. आजपर्यंत अहो, जाओ करत होतो.  तुम्ही विचाराने चुकलात. तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत. आम्ही नाही सोडले. तुम्ही रक्ताचे आणि आम्ही वैचारिक वारसदार आहोत," असं आव्हाड म्हणाले आहेत.

"स्वत:च्या वडिलांनी तुमचा निषेध केला होता. वडील खासदार झाले म्हणून तुम्ही जळत आहात. सर्व पक्षांच्या दरवाजात तुम्ही जाऊन आलात. त्यांनी तिकीट न दिल्याने आणि वडील खासदार झाले यामुळे आग लागल्याने त्यातून बेताल वक्तव्य करत आहात," असा आरोप त्यांनी केला. 

छत्रपती शिवाजीराजांचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी संभाजीराजेंनी गद्दारी केली आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
 
मी पोलिसांना तुम्ही गाडीतून का उतरला नाहीत अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून फायरिंग केलं नाही. नाहीतर फायरिंग करु शकलो असतो असं सांगितलं असा दावा त्यांनी केला. मी मेलो तरी माफी मागणार नाही. माफी त्यांनी महाराष्ट्राची मागितली पाहिजे असंही ते म्हणाले.