मोदींच्या मंत्रिमंडळातील तुमचा आवडता चेहरा कोणता? शरद पवारांनी दिलेलं उत्तर ऐकून भुवया उंचावतील

Sharad Pawar Praise Nitin Gadkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांचे आवडते नेते असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी दंगली रोखणं राज्य सरकारची जबाबदारी असताना तेच प्रोत्साहन देत असल्याची टीका केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 7, 2023, 11:18 AM IST
मोदींच्या मंत्रिमंडळातील तुमचा आवडता चेहरा कोणता? शरद पवारांनी दिलेलं उत्तर ऐकून भुवया उंचावतील title=

Sharad Pawar Praise Nitin Gadkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांचे आवडते नेते असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी राज्यात होणाऱ्या दंगली तसंच देशात चर्चवर होणार हल्ले यावर चिंता व्यक्त करत राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. दंगली रोखणं राज्य सरकारची जबाबदारी असताना तेच प्रोत्साहन देत असल्याची टीका त्यांनी केली आहे. ते संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

केंद्र सरकारला 9 वर्षं पूर्ण झाली आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळातील तुमचा आवडता चेहरा कोण आहे? असं विचारलं असता शरद पवार यांनी सांगितलं की, "शासन तुमच्या हाती आल्यानंतर तुम्ही काहीतरी निकाल दिला पाहिजे. त्यामध्ये नितीन गडकरी आहेत. ते पक्षीय दृष्टीकोन ठेवत नाहीत. एखादा प्रश्न सांगितला तर कोण सांगतंय यापेक्षा प्रश्न किती महत्त्वाच आहे याकडे त्यांचं लक्ष असतं. ही एक समंजसपणाची गोष्ट आहे. पण हा अनुभव फक्त त्यांच्याबद्दलच आहे". 

कुस्तीगिरांच्या आंदोलनावर भाष्य

"कुस्तीगिरांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष झालं आहे असं मला वाटत नाही. बृजभूषण सिंह सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्याने केंद्र सरकार किती खोलात जातंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. चौकशी सुरु झाल्याची बातमी आहे. कुस्तीगीर अटक करण्याची मागणी करत असून, सरकार मात्र आधी चौकशी करतो आणि नंतर कारवाई असं सांगत आहे. पण निदान चौकशीची प्रक्रिया सुरु झाली ही समाधानाची बाब आहे," असं शरद पवार म्हणाले. 

"सत्ताधाऱ्यांकडून धार्मिक गोष्टींना प्रोत्साहन देणं अयोग्य"

"मोबाइलवर मेसेज पाठवला म्हणून लगेच रस्त्यावर उतरुन त्याला धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही. सत्ताधारी पक्ष अशा गोष्टींना प्रोत्साहित करत आहे. शांतता,सुव्यवस्था राखणं ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे, पण जर तेच उतरायला लागले आणि दोन समाजात कटुता निर्माण झाली तर ते योग्य नाही. जर दंगल मर्यादित भागात झाली असेल तर चांगली बाब आहे. पण हे घडवलं जात आहे. औरंगाबादमधअये औरंगजेबाचा फोटो दाखवला यासाठी पुण्यात दंगल होण्याचं काय कारण आहे? फोटो दाखवला म्हणून काय परिणाम होतो समजत नाही," अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. 

ख्रिश्चन आणि मुस्लीम धोक्यात आहे असं विधान करण्यामागील कारण विचारलं असता शरद पवार म्हणाले "ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ला केला जात आहे. ख्रिश्चन समाज तसा शांतताप्रिय आहे. काही असेल तर पोलीस कारवाई करावी, त्यासाठी चर्चावर हल्ला कशाला? हे काही एकटयाचं काम नाही. त्यामागे विचारधारा आहे. ती विचारधारा समाजाच्या हिताची नाही," असं शरद पवारांनी सांगितलं. 

"महाराष्ट्र आणि तेलंगणात फरक"

"तेलंगणात शेतकऱ्यांना रोख रक्कम दिली जाते याची माहिती घेत आहे, ते लहान राज्य आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणात फरक आहे. लोकांना काय हवं ते समजून घेतलं पाहिजे. पायाभूत सुविधांवर जास्त खर्च केला पाहिजे. दळणं, रस्ते, वीज, आरोग्य, शाळा यावर गुंतवणूक करणं अधिक उपयुक्त असतं. त्यादृष्टीने तेलंगणची योजना समजून घेतली पाहिजे," असं शरद पवारांनी सांगितलं. मी चौकशी केली असता कांदा हैदराबादला विकला गेलेला नाही. आपण घोषणा फार करतो, पण त्या कृतीत यायला हव्यात आणि व्यवहारी असल्या पाहिजेत असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.