वसईत नेपाळी गँगचा पर्दाफाश, बंद घरातून लाखो रुपयांची चोरी

बिल्डिंगच्या वॉचमननेच केला घात, दरोड्यासाठी तयार केली टोळी

Updated: Jan 14, 2022, 09:18 PM IST
वसईत नेपाळी गँगचा पर्दाफाश, बंद घरातून लाखो रुपयांची चोरी

प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई  : वसईत एका उच्चभ्रू वस्तीत झालेल्या लाखो रुपयांच्या चोरीचा अखेर उलगडा झाला असून पोलिसांना या गुन्ह्यातील आरोपींना भारत-नेपाळ बॉर्डर वरून  अटक करण्यात यश आलं आहे.  

बिल्डींगमध्ये काम करणाऱ्या वॉचमनेच आपल्या दोन  साथीदारांसह ही चोरी केल्याचे तपासात समोर आलं आहे. धरमराज ढकाल , राजेश सोनी आणि नरेश ढकाल अशी आरोपींची नावे असून ते तिघेही नेपाळमधले आहेत.

वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरातील चिंतामणी सोसायटीतील एका बंद घरात  लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना ७ जानेवारीला घडली होती .ही चोरी दुसरी तिसरी कोणी नव्हे तर बिल्डींगमध्ये काम करणाऱ्या वॉचमननेच केली होती. 

या चोरीसाठी बिल्डींगचा वॉचमन धरमराज ढकाल याने दोन साथीदारांना बोलावून घेतलं होतं.  शिडीचा वापर करून त्यांनी  टॉयलेटच्या खिडकीतून घरात प्रवेश केला आणि घरातून रोख रक्कम, सोन्याचे दागिने,  मौल्यवान वस्तूं  असा आठ लाखांचा मुद्देमाल त्यांनी चोरला होता. 

घरमालकाने दिलेल्या तक्रारीवरून वसईच्या माणिकपूर पोलिसात या चोरीची  नोंद करण्यात आली होती. पोलीस तपासात इमारत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच तपासले गेले असता बिल्डींगच्या वॉचमननेच ही चोरी केल्याचे समोर आलं.

त्यानंतर पोलिसांना तांत्रिक बाबी आणि लोकेशन वरून आरोपी नेपाळ-भारत बॉर्डर परिसरात असल्याचे समजल्यानंतर  गुन्हे शाखेकडून  अटकेची कारवाई करण्यात आली. चोरलेला  मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघेही आरोपी सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करणारे आहेत.  त्यांनी यापूर्वी असे किती गुन्हे केलेत याचा पोलीस तपास घेत आहेत.

दोन महिन्यापूर्वीही घडली होती अशीच घटना
दोन महिन्यांपूर्वी वसईत असाच एक प्रकार उघडकीस आला होता. ज्यात एका डॉक्टरच्या बंगल्यात काम करणाऱ्या नेपाळी सुरक्षा रक्षकाने त्याच्या साथीदारांसह चोरी केली होती. वसई पोलिसांकडून त्यांना अटकही करण्यात आली होती. मात्र या घटनांवरून नेपाळ येथून अनेक आरोपी चोऱ्या करायच्या उद्देशाने सुरक्षा रक्षकांची नोकरी आपल्या परिसरात घुसखोरी करत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे आपण नेमत असलेला सुरक्षा रक्षक चोर तर नाही ना ? याची खातरजमा नक्की करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.