बापरे! राज्यात सापडले डेल्टा वेरिएंटचे 21 रूग्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

धोकादायक 'डेल्टा प्लस' व्हेरियंटने राज्यात शिरकाव केला आहे.

Updated: Jun 22, 2021, 08:00 AM IST
बापरे! राज्यात सापडले डेल्टा वेरिएंटचे 21 रूग्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

मुंबई : भारतात सापडलेल्या कोरोना डेल्टा प्लस व्हायरसचा अख्ख्या जगालाच धोका आहे. तर धोकादायक 'डेल्टा प्लस' व्हेरियंटने राज्यात शिरकाव केला आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे एकूण 21 रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे या व्हायरसने स्वतःला असं काही बदललंय की कोरोनावरची औषधं आणि लसही प्रभाव पाडू शकेल का याबद्दल शंका निर्माण केली जातेय.

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रूग्ण सापडल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे म्हणाले, "15 मे पासून जवळजवळ 7 हजाराच्या वर सॅम्पल घेण्यात आले असून यांचं whole genome sequencing करण्यात आलं. ज्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रूग्ण सापडले आहेत." 

तर दुसरीकडे डेल्टा प्लस व्हायरसवर कोरोनावरची औषधं आणि लसही प्रभावी ठरण्यावर शंका निर्माण केली जातेय. डेल्टा प्लस त्याच्यामधल्या स्पाईक प्रोटीनच्या मदतीने पेशींवर आक्रमण करतो. आणि हा व्हायरस रोगप्रतिकारकशक्तीवर जबरदस्त हल्ला करतो. त्यामुळेच कोरोनावरची लस डेल्टावर परिणामकारक ठरण्याबद्दल साशंकता आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटवर अँटिबॉडी कॉकटेलचाही परिणाम होत नाहीये.

डेल्टा व्हेरियंट सगळ्यात आधी भारतात ऑक्टोबर महिन्यात सापडला होता. भारतात दुस-या लाटेचा कहर डेल्टा व्हेरियंटमुळेच झाल्याचा अंदाज आहे. सध्या इंग्लंडमध्ये डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण वाढतायत. फायझर आणि अॅस्ट्राझेन्काच्या लसी डेल्टा व्हेरियंटपासून संरक्षण देतात, असा दावा करण्यात आलाय. 

सध्या कोरोनावरच्या लसी या अल्फा व्हेरियंटसाठी बनवण्यात आल्या आहेत. पण डेल्टा व्हेरियंटला विचारात घेऊन लसी तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे डेल्टाचा धोका कायम आहे.