Nilesh Lanke: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटातील नेते निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो दिसले. यातच त्यांनी खासदरा अमोल कोल्हे यांची भेट घेतल्याने चर्चा आणखी जोरात होऊ लागल्या. यावर निलेश लंके यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी महानाट्यासंदर्भात अमोल कोल्हे यांची भेट घेतली. मी प्रवेश करणार अशा बातम्या आल्या पण मलाच याबद्दल माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.
लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन अमोल कोल्हेंनी केले होते. यावरही ते म्हणाले. आपला पक्ष वाढावा, असे प्रत्येकाला वाटत असते. पण अजून काही ठरलं नाहीय. राजकारणात माहिती नसत आता काय होणारेय. पुढच्या वेळेस काय होणार? हे माहिती नसतं. असे म्हणत लंके यांनी आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे.
लोकसभा मतदार संघामध्ये मी संपर्क वाढलाय. माझ्या सहकारींची तशी इच्छा आहे. पण मी अद्याप निर्णय घेतला नाही, असेही त्यांनी पुढे सांगितले. लोकसंपर्क वाढवण्याचा, मित्रपरिवार जपण्याचा मला छंद आहे. याचा अर्थ मला निवडणुका लढवायच्या आहेत, असा अर्थ नाही. मी जिल्ह्याच्या बाहेरही जातो. याचा अर्थ मला तिथे लोकसभा लढवायची असा नाही, असे ते म्हणाले.
निवडणुका लढवण्याच्या चर्चेला तुम्ही पूर्णविराम देताय का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी राजकारणात काही सांगता येत नाही. महायुतीच्या जागावाटपात जागा भाजपकडे गेली. त्यावर तुम्ही अजित दादांकडे मागणी कराल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी मी शेवटच्या स्तरातील कार्यकर्ता आहे. जागावाटप हा मोठ्या नेत्यांचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
माझा काल वाढदिवस होता. तेव्हा मला अजित दादांचा फोन आला. प्रत्येक पक्षाचा नेता हा कार्यकर्त्याच्या संपर्कात असतो, असे ते म्हणाले. आपला नेता मोठा झाला पाहिजे ही कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते. पक्षाने जबाबदारी दिली तर आपण खेळाडू आहे. तो नेहमी मैदानात असतो. वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो होता, यावरही त्यांनी भाष्य केले. कार्यकर्ते प्रेमाने बॅनर लावतात. त्यांना प्रोटोकॉल नसतो. मला प्रोटोकॉल आहे. माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन असे काही होणार नाही. इतर पक्षात कोण काय करतं? कोणाचं काय काम आहे? हे बघण्यापेक्षा आपल्या कामाची रेष वाढवावी, असे मानणारा मी कार्यकर्ता असल्याचे लंके म्हणाले.