मुंबई / पुणे : नीरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून जाणारं बारामतीचं पाणी तोडण्यासाठी खलबतं सुरू आहेत. यासंदर्भात मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी माढाचे नवनिर्वाचित खासदार रणजित निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत जलसंपदामंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. तसंच पुढील दोन-तीन दिवसांत बारामतीला पाणी बंद करण्याबाबत अध्यादेश काढण्याचंही गिरीश महाजनांनी आश्वासन दिलंय. त्यामुळे बारामतीला जाणाऱ्या पाण्यावरून जोरदार राजकारण रंगणार असल्याची चिन्ह आहेत.
सर्वत्र पाण्याचं दुर्भिक्ष असताना निरा डाव्या कालव्याचं बारामतीला जाणारं पाणी बंद करण्याबाबतचा वाद अधिक वाढवू नये, असं आवाहन शरद पवारांनी केलंय. राजकारण कुठे आणि कधी करायचं? याबद्दलचं तारतम्य बाळगायला हवं, अशा कानपिचक्याही पवारांनी दिल्यात. दोन जिल्ह्यात दुरावा निर्माण होऊ नये, याची काळजी आपण घेणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलय. शरद पवार आज बारामती तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागांना भेट देत आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यांच्यासोबत आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहेत. दुष्काळ निवारणासंदर्भात सरकारकडून उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र त्यात आणखी काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात ७ जूनला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. सुपा गावातील गुरांच्या छावणीला भेट दिल्यानंतर त्यांनी गावातील जामा मशिदीत जाऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या तसंच शिरखुरम्याचा आस्वाद घेतला.
त्याचपद्धतीनं नीरा देवधर प्रकल्पाच्या पाण्याचं वाटप समन्यायी पद्धतीनं व्हावं, त्यात राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया बारामती परिसरातील ग्रामस्थांनी दिलीय. निरा डावा कालव्यातील पाणी बंद झाल्यास बारामतीत पाण्याचं दूर्भिक्ष्य निर्माण होईल. निरा उजवा कालव्याद्वारे माढ्याला पाणी सोडत असताना बारामतीचं पाणी तोडू नये, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केलीय.