दीपक भातुसे, मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयात १० बाळं आगीत होरपळून हे जग पाहण्याआधीच सोडून गेली. याला नेमकं कोण जबाबदार, याचं उत्तर आज मिळालंय. पण तरीही महिना उलटला तरी अजून एकावरही गुन्हा दाखल झालेला नाही. २१ मिनिटं बाळं होरपळत होती. कोण होतं याला जबाबदार?
कर्मचा-यांचा हलगर्जीपणा
भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० बाळं होरपळून मेली. अख्खा महाराष्ट्र या घटनेनं हेलावला. आता ही बाळं कुणाच्या दुर्लक्षामुळे गेली त्याचं संतापजनक कारण समोर आलंय. ही आग लागल्यानंतर खरं तर इथे उपचारांसाठी दाखल असलेल्या या बालकांना तातडीने बाहेर हलवायला हवं होतं. मात्र त्यासाठी ही आग लागल्याचं कुणाच्या तरी लक्षात यायला हवं होतं. आग लागल्यापासून २१ मिनिटं या वॉर्डमध्ये कुणीच उपस्थित नव्हतं. त्यामुळे २१ मिनिटं धुरामध्ये तडफडून १० बाळांचा मृत्यू झाला. इथल्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी कलिनामधल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात आली तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे.
एकही नर्स उपस्थित नव्हती
नवजात बाळांच्या आयसीयूमध्ये आग लागली तेव्हा वॉर्डमध्ये किंवा नर्सिंग स्टेशनमध्येही एकही नर्स उपस्थित नव्हती. त्यामुळे आग लागलीय आणि त्यात बाळं जळतायत, हे कुणाच्या लक्षातच आलं नाही.
दुर्घटना घडली तेव्हा मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री एवढंच काय राज्यपालांनीही या रुग्णालयाला भेट दिली होती. मात्र याप्रकरणी अजूनही कठोर कारवाई झालेली नाही. अक्षम्य हलगर्जीपणामुळे १० बाळं होरपळून मेली. पण एकावरही अजून गुन्हा दाखल झालेला नाही, हे प्रचंड संतापजनक आहे.