औरंगाबाद : बकरी ईदसाठी कुठलीही सूट मिळणार नसल्याचं औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तांनी म्हटलं आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी ईदसाठी मशीद उघडणे आणि प्राण्यांची कुर्बानी देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता महापालिका हद्दीत सूट मिळणार नसल्याचं मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ईद घरीच साजरी करण्यात यावी. सार्वजनिक ठिकाणी जमून सामूहिक नमाज अदा करण्यास बंदी असेल, असे आदेश महापालिकेचे आयुक्तांनी दिले आहेत. ईदच्या दिवशी मशिद किंवा इदगाह परिसरातही जमण्यास देखील मनाई करण्यात आले आहे.
सध्या जनावरांचे बाजारही बंद आहेत. त्यामुळे बकरी ईदसाठी नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी, असेही सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रतिकात्मक कुर्बानी करावी, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.
बकरी ईदसाठी जनावरांचे बाजार उघडावे आणि मशिदी ही खुल्या करण्यात यावी. अशी मागणी औरंगाबादच्या उलेमा संघटनांनी केला आहे. मशिदी बरोबरच सर्व धार्मिक स्थळं उघडावी अशी मागणी खासदार अम्तियाज जलील यांनी केली होती. तर शिवसेनेने मात्र याला विरोध केला होता. त्यामुळे औरंगामधील राजकारण तापलं आहे.