बीड : भाजप सोडण्याच्या पंकजा मुंडे यांच्या चर्चेवर खुद्द पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये भाष्य केले आहे. आपल्या भवितव्याबाबत कोणीही चिंता करु नये, असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला आहे. तब्बल आठ महिन्यानंतर पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यामध्ये आल्या. त्यावेळी त्यांचे स्वागतही झाले. आता सावरगावमध्ये उद्या दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
पंकजा मुंडे यांचा पहिल्यांदा हा मेळावा ऑनलाईन होणार आहे. दरवर्षी राजकीय भूमिका पंकजा मुंडे यांची दसरा मेळाव्यातून ठरते. त्यामुळे दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांचे प्रेम आणि उत्साह हेच माझ्यासाठी मोलाचे आहे. गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी केलेले भाजपसाठीचे काम महत्त्वाचे आहे. मी माझी भूमिका गोपीनाथ गडावर स्पष्ट केली होती. ऊसतोड मजूरांचा संप आता संपला आहे. ऊस कामगारांच्या मुद्द्यावरून कोणी हाता राजकारण करू नये, असे त्या म्हणाल्या.
पंकजा यांचा रविवारी दसरा मेळावा होणार आहे. सकाळी ८.३० वा. यशश्री बंगला परळी येथून गोपीनाथगड कडे प्रयाण. सकाळी ८.४५ वा. गोपीनाथ गड तालुका परळी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मृती स्थळी दर्शन. सकाळी ९ वाजता गोपीनाथगड येथून 'भगवान भक्ती गड' सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड कडे वाहनाने प्रयाण.
त्यानंतर दुपारी १२ वाजता 'भगवान भक्ती गड' सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे आगमन व दर्शन आणि 'भगवान भक्ती गड' सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड येथून ऑनलाईन दसरा मेळाव्यास त्या संबोधणार आहेत.