'शपथविधी दणक्यात पण ठाकरे सरकार काम कधी करणार ?'

 अजूनही खातेवाटपाचा पत्ता नाही. लवकरच होईल याशिवाय कुठलंही उत्तर महाविकासआघाडीकडे नाही.

Updated: Dec 9, 2019, 06:56 PM IST
'शपथविधी दणक्यात पण ठाकरे सरकार काम कधी करणार ?' title=

मुंबई : मोठ्या दणक्यात शपथविधी झाला, सरकार आलं. पहिल्याच दिवशी मुख्यमंमत्र्यांनी पदभार स्वीकारला. पण अजून खातेवाटपाचा पत्ता नाही. मंत्री आहेत. पण खाती नाहीत. स्थगितीच्या आणि फेरआढाव्याच्याच केवळ घोषणा झाल्या. त्यामुळे हे सरकार काम कधी करणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शपथ घेऊन आणि महाविकासआघाडीचं सरकार येऊन बारा दिवस उलटून गेले. पण अजूनही खातेवाटपाचा पत्ता नाही. लवकरच होईल याशिवाय कुठलंही उत्तर महाविकासआघाडीकडे नाही.

गृह आणि नगरविकासच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडीच्या खातेवाटपाचं घोडं अडलंय. राष्ट्रवादीला गृहखातं किंवा नगरविकास खातं हवंय पण शिवसेना ते सोडायला तयार नाही.यंदाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विभागवार चर्चा आणि प्रश्नोत्तराचा तास नसेल, असं सांगण्यात आलंय. ठाकरे सरकारनंही सत्तेवर आल्यापासून स्थगिती आणि आढाव्यापलीकडे काही केलं नाही.

मंत्री आहेत पण खाती नाहीत, दालनं आहेत पण कामं नाहीत अशी परिस्थिती आहे. खातेवाटपाचा पत्ता नाही पण बंगल्यांचं वाटप मात्र तातडीनं झालं. सरकार काम करायला सुरुवात करणार तरी कधी ? हा नोकरशाहीबरोबरच जनतेचाही प्रश्न आहे.

राणेंचा प्रहार 

या नव्या सरकारमध्ये मंत्री नाहीत, खाती नाहीत, हे तीन पक्षांचं सरकार आहे, या पक्षाचं कोकणात अस्तित्व दिसत नाही, यामुळे कोकणात विकास कामं ठप्प झाली असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. तसेच भाजप नेते १५ ते १८ डिसेंबर दरम्यान सिंधुदूर्ग दौरा करणार असल्याचंही यावेळी नारायण राणे यांनी सांगितलं. हे सरकार दीर्घकाळ चालणार नाही, हे पाहुणं सरकार आहे, वैयक्तिक स्वार्थासाठी तीनही पक्ष एकत्र आले आहेत, नवं सरकार म्हणजे स्थिगिती सरकार आहे, आर्थिक फायद्यासाठी कामांना स्थिगिती दिली जात असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला.