OBC RESERVATION : भाजप आक्रमक, उद्या राज्यात एक हजार ठिकाणी निदर्शनं करणार

राज्यातील मंत्र्यांना ओबीसी समाज रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे

Updated: Sep 14, 2021, 01:48 PM IST
OBC RESERVATION : भाजप आक्रमक, उद्या राज्यात एक हजार ठिकाणी निदर्शनं करणार

नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या (obc reservation) मुद्द्यावरून भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या पाठित खंजीर खुपसला असून सर्व पक्षांची मदत असतानाही महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आलं असा आरोप भाजप नेते चंद्रशेख बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यात जोरदार आंदोलन करण्यात येईल. एक हजार ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याने त्यांनी संतापही व्यक्त केला. नागपुरात सहा ठिकाणी आंदोलन होईल असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि इतर भाजप नेते या आंदोलनता सहभागी होतील, असं सांगतानाच जोपर्यंत ओबीसींना न्याय मिळत नाही. तोपर्यंत भाजप आंदोलन करतच राहणार, तसंच राज्यातील मंत्र्यांना ओबीसी समाज रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.

ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून सरकारमधील झारीतले शुक्राचार्य जबाबदार आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनीही विधी आणि न्याय विभागाने व्यवस्थित बाजू न मांडल्याने आरक्षण गेल्याचं सांगितलं. छगन भुजबळ मेळावे घेत राहिले मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र लक्ष दिले नाही, 28 जुलै ते आजपर्यंत एकही बैठक झाली नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

सहा महिन्यात राज्य सरकारने काय केलं? हे सर्वोच्च न्यायालयाने विचारलं. पण राज्य सरकारने काहीही केलं नाही. ओबीसी आयोगाचा प्रस्ताव आल्यानंतर मुख्य सचिवाने एकही बैठक घेतली नाही. मुख्य सचिवांवर बैठक न घेण्याबाबत दबाव आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसंच पाचही जिल्हा परिषदमध्ये भाजप ओबीसी उमेदवार देणार असल्याचं बाववकुळे यांनी सांगितलं.