तुर्कस्तानातून आयात केलेला कांदा बेचव, ग्राहकांची पाठ

तुर्कस्तानातून आलेला कांदा बेचव निघाला आहे.

Updated: Jan 18, 2020, 07:58 PM IST
तुर्कस्तानातून आयात केलेला कांदा बेचव, ग्राहकांची पाठ  title=

चाकण : तुर्कस्तानातून आयात झालेला कांदा चाकण बाजार समितीत दाखल झाला आहे. मात्र हा तुर्कस्तानातून आलेला कांदा बेचव निघाला आहे. या कांद्याची विक्री होत नसल्याने चाकण बाजार समितीत हा कांदा पडून आहे. तुर्कस्तान पाठोपाठ इजिप्तचा कांदाही इथं दाखल झाला आहे. 30 रुपये किलो दराने तुर्कस्तानातून आयात केलेला कांदा चाकण बाजारात 15 रुपये प्रति किलोदराने देखील विक्री होत नाही. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावाने आजही उच्चांक गाठला. स्वस्त हॉटेल व्यवसायिक स्वस्तात मिळणाऱ्या कांद्याला पसंती देत आहेत. शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.  

कांद्याची मागणी वाढल्याने आणि भारतात कांद्याचं उत्पादन लांबल्याने कांदा महागला आहे. त्यामुळे बाहेरुन कांदा आयात केला गेला. पण हा कांदा बेचव असल्याने नागरिकांनी या कांद्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे विक्रेत्यांना देखील याचा फटका बसत आहे. कांदा पडून असल्याने सडण्याची शक्यता ही वाढली आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घटले. नवा कांदा येण्यासाठी वेळ असल्याने कांद्याचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे कांदा आयात केला गेला. कांद्याची दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केलेत. पण आयात कांदा ग्राहकांना पसंतीत पडला नाही. सध्या बाजारात फक्त १० ते १५ टक्के जुना कांदा आहे. यंदा कांद्याच्या भावाने उंच्चाकी दर गाठला आहे. त्यामुळे कांदा ग्राहक आणि व्यापारी दोन्हींच्या डोळ्यात पाणी आणत आहे.