लाव रे 'तो' व्हिडिओ! फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पवारांच्या वक्तव्याबाबत म्हणाले.... 

Updated: Oct 20, 2020, 11:31 AM IST
लाव रे 'तो' व्हिडिओ! फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा पाहणी दौरा करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य शासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्याच एका जुन्या व्हिडिओचा संदर्भ देत फडणवीसांनी त्यांच्यावर टीका केली. 

उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी करणाऱ्या जुन्या क्लिप आहेत, त्याच क्लिप दाखवत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं. देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना अवकाळी पावसानं झोडपलेल्या भागासाठी कोट्यवधींची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली मदत ही तुटपूंजी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारला निशाणा केलं होतं. सरकारी निकष बाजूला ठेवत शेतकऱ्यांची मदत करावी असा सूर त्यांनी लगावल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. हाच व्हिडिओ दाखवत मुख्यमंत्र्यांकडे आता बळीराजाला मदत करण्याची संधी असल्याचं म्हणत फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

आता संवेदनशीलता दाखवली पाहिजे, असं म्हणत काही झालं की केंद्र सरकारकडे टोलवायचे पण उलटपक्षी पंतप्रधानांनी आधीच फोन करून मुख्यमंत्र्यांना मदतीचं आश्वासन दिल्याचा मुद्दा फडणवीसांनी अधोरेखित केला.

 

पवारांच्या वक्तव्याबाबत म्हणाले.... 

शरद पवार यांच्या मदतीसंदर्भातील वक्तव्याबाबत आपलं मत मांडत केंद्राकडून मदत केव्हा येते यांची त्यांना पूर्ण कल्पना असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. केंद्र सरकार मदत करेलच, याआधीच्या UPA सरकारने जेवढी मदत केली होती त्यापेक्षा जास्त मदत करेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.