नागपूर : नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या मुद्दयावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. नाणार प्रकल्पाबाबत जनतेच्या मनात गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणार आहे की नाही याबाबत राज्य सरकारची काय भूमिका आहे असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. यावर उद्योगमंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्यावर अजून सरकारनं निर्णय केला नसल्याचं सांगत पुन्हा एकदा शिवसेनेला खो देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकल्प आम्ही लादणार नसून सर्वांशी चर्चा करून तोडगा काढणार असल्याची सावध भूमिकाही मुख्यमंत्र्यांनी घेतली.
नाणार प्रकल्पाला स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचाही विरोध आहे. नाणारमुळे राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळतंय. शिवसेनेनं या प्रकल्पाला उघड विरोध दर्शवला आहे. नाणारवर शिवसेनेनं अजून कोणताही ठाम भूमिका अधिवेशनात मांडलेली नाही. त्यामुळे शिवसेना कशी भूमिका मांडते याकडे ही लक्ष लागून आहे.
रत्नागिरीत हा प्रकल्प दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे जाहीर आभार मानले होते. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान मुंबई दौऱ्यावर आले होते तेव्हा उद्धव ठाकरेंना ते भेटतील अशी चर्चा देखील होती. पण तसं झालं नाही. तेलशुद्धीकरणाच्या करारावरून मंत्रीमंडळात शिवसेनेच्या मंत्र्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे कुठल्याही स्थितीत नाणारमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार खुद्द उद्धव ठाकरेंनी केला आहे.