योगेश खरे, नाशिक : नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसानं ओढ दिल्याने शेतकरी मोठ्या अड्चणीत सापडला आहे. मात्र जूनच्या पाहिल्याच आठवड्यात ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. त्यामुळे नाशिकमधला शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असला तरी मुंबईला पाणी पुरवठा करणारा नाशिकचा जिल्हा मात्र अजून कोरडाच आहे. गेल्या वर्षीपेक्षा आजच्या दिवशी दहा टक्के जलसाठा कमी झाला आहे. शेतकऱ्यांनी पाऊस पडेल अशी आशा बाळगत भात पेरणी करून ठेवली आहे. मात्र पाऊसच न पडल्याने ११ तालुके अडचणीत आहेत.
नाशिक जिल्हा हा धरणांचा जिल्हा आहे. पावसाची सर्वाधिक गरज या जिल्ह्यात असते. केवळ नाशिक जिल्ह्यालाचा नाही तर मुंबई, नगर आणि मराठवाड्याची तहान इथली धरणं भागवतात. मात्र वरूणाची कृपा इथे झालेली नाही. गेल्या पावसाळ्याच्या तुलनेत अजून इथे पाऊस फार कमी झालाय. जिल्ह्यात एकूण २४.२६ टक्के पाऊस झालाय. तर त्र्यंबक, इगतपुरी, पेठ, सुरगाणा इथे २० टक्क्यांवर पाऊस झालाय. इतर अकरा तालुके अजून पावसासाठी आसुसले आहेत.
जिल्ह्यात २३ धरणं आहेत. त्यांची एकत्रित पाणीसाठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट आहे. यात गेल्यावर्षी एकूण २६ टक्के साठा होता. मात्र सध्या तो १७ टक्केच आहे. गंगापूर धरणात गेल्या ९ दिवसात पाणीपातळी वाढून ११ हजार ५१३ दशलक्ष घनफूटावर पातळी आलीय. दारणा मात्र अजून हवे तसे भरलेले नाही. भोजापुरात पाणीसाठाच नाही, तर गिरणात ११ टक्के साठा आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत असले तरी नाशिक जिल्ह्यात पाऊस पडणे गरजेचे आहे... इथली धरणं किती भरतात याकडे अर्धा महाराष्ट्र डोळे लावून बसलेला असतो.