साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या मूर्ती संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झालीय. 1500 किलो शेंदूर काढल्यानंतर सप्तसृंगी देवीचं मूळ मनोहर रुप दिसलंय.
गेल्या 45 दिवसांपासून देवीच्या मूर्तवर संवर्धनाची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. देवीवरील 1500 किलो शेंदूराचं कवच काढण्यात आलं असून त्यामुळे आता देवीचं मूळ रूप दिसतंय.
हे रूप अतिशय वेगळं असून देवीची मूर्ती अत्यंत मोहक दिसतेय. देवीचा शेंदूर काढण्याची सर्व प्रक्रिया ही पुरातत्व खात्याच्या नियमानुसार करण्यात आलीय.
यामध्ये कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा वापर करण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार अंदाज लावला तर आधी जो शेंदूर लावला होता तो, या आधी 1000 वर्षांपूर्वी लावण्यात आला होता.
आता शेंदूर काढल्यानंतर मूर्तीचं मूळ रुप पाहायला मिळत आहे. जे अतिशय मनमोहक आहे. शेंदूर काढण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेनंतर समोर आलेली मूर्ती हीच खरी मूळ मूर्ती असल्याचे आता बोललं जात आहे.
सप्तशृंगी मातेचं या मनमोहक रूपाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे मातेचं रूप डोळे भरून पाहण्याची इच्छा आता भाविकांमध्ये आहे मात्र त्यासाठी काही दिवस थांबावं लागणार आहे.
येत्या 26 सप्टेंबर रोजी घटस्थापनेपासून भाविकांसाठी देवीचं मंदिर खुलं होईल.