Pune Police Arrest Pakistani Youth : पुण्यात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या पाकिस्तानी तरुणाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याजवळ बनावट पासपोर्ट आढळला आहे. या तरुणाची पोलिस कसून चौकशी करत आहेत. तब्बल आठ वर्षांपासून हा तरुण पुण्यात राहत होता. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुण पोलिसांच्या विशेष शाखेने (स्पेशल सेल) या पाकिस्तानी तरुणावर कारवाई केली आहे. पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाकडून बनावट भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. महम्मद अमान अन्सारी (वय 22) असे अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी अन्सारी याच्या विरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 आणि पारपत्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष शाखेतील परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अन्सारी पाकिस्तानी नागरिक असून तो शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. त्यानंतर त्याला भवानी पेठेतील चुडामण तालीम चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे.
या तरुणाने बनावट कागदपत्र देखील तयार केली होती अशी माहिती समोर आली. इतकंच नाहीतर बनावट पासपोर्टवर हा तरुण पुणे ते दुबई प्रवासही करुन आला आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा
सप्टेंबर 2022 मध्ये पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा झाल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. पुण्यात पीएफआय (PFI) अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी करण्यात आली होती. 'एनआयए'ने छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, नाशिक आदी शहरांमध्ये छापेमारी करत अनेकांना अटक करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ पुण्यातील मुस्लीम समाजातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या होत्या.