पंढरपुरात प्रकाश आंबेडकरांसह १२०० जणांवर गुन्हा दाखल, वंचितचा आंदोलनाचा इशारा

 वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Updated: Sep 2, 2020, 11:46 AM IST
पंढरपुरात प्रकाश आंबेडकरांसह १२०० जणांवर गुन्हा दाखल, वंचितचा आंदोलनाचा इशारा title=

पंढरपूर : पंढरपुरात मंदिर प्रवेश आंदोलन केल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासह बाराशे जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर वंचितने आंदोलनाचा इशारा दिला आहे. गुन्हा मागे घ्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल असा इशारा प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी ३१ ऑगस्ट रोजी पंढरपुरात जाऊन आंदोलन केले होते. यावेळी त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच वारकरी संप्रदायाचे लोकं उपस्थित होते. विठ्ठल रखुमाई मंदिर उघडल्या शिवाय पंढरपूर सोडणार नाही अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली होती. त्यानंतर मंदिरात प्रकाश आंबेडकर यांच्यासह काही जणांना प्रवेश देण्यात आला होता. तसेच येत्या येत्या आठ ते दहा दिवसात राज्यातील सर्व मंदिरांबाबत नियमावली तयार करून मंदिर उघडली जातील, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण १० दिवसानंतर आदेश आला नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला होता. 

पंढरपूर मंदिर परिसरात यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलिसांनी यानंतर प्रकाश आंबेडकर, वारकरी संप्रदायाच्या लोकांसहित वंचित बहुजन आघाडीच्या बाराशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

दरम्यान पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत्या ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापनानं खास पत्रक काढून ही माहिती दिली आहे.