डॉक्टर सुनेनं स्वत:ला संपवलं! शिंदे गटाच्या नेत्याला पोलिसांकडून अटक

Pandharpur Dr Richa Rupnar Death By Suicide Case: 35 वर्षीय महिला डॉक्टराने 6 जून रोजी आपल्या राहत्या घरामध्ये गळफास लावून स्वत:ला संपवलं. या महिला डॉक्टरमागे दोन मुलं, पती असा परिवार असून या प्रकरणाची सध्या सांगोल्यामध्ये जोरदार चर्चा आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 12, 2024, 01:06 PM IST
डॉक्टर सुनेनं स्वत:ला संपवलं! शिंदे गटाच्या नेत्याला पोलिसांकडून अटक title=
पोलिसांनी शिंदे गटाच्या नेत्याला केली अटक (पोलिसांचा फोटो प्रातिनिधिक)

Pandharpur Dr Richa Rupnar Death By Suicide Case: सांगोल्यातील डॉक्टर ऋचा रुपनर आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी उद्योगपती तसेच सध्या मुख्यमंत्री शिंदे गटात असणारे भाऊसाहेब रुपनर यांना आज सकाळी अटक केली आहे. ऋचा ही भाऊसाहेब रुपनर यांची सून आहे. ऋचाने 6 जून रोजी पतीच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणामध्ये कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात होता. मागील पाच दिवसांपासून या प्रकरणात पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही असा आरोप करत शहरातील डॉक्टरांनीही ऋचाला न्याय मिळवून देण्यासाठी हलचाली सुरु केल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आज शिंदे गटाच्या नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामध्ये ऋचाचा पती सुरज हा अद्याप फरार आहे. 

जनतेनं निर्माण केला दबाव

ऋचाने गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंढरपूर रोड येथील फॅबटेक कॉलेज वसाहतीमधील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. 35 वर्षीय ऋचाने घरच्या जाचाला कंटाळून स्वत:ला संपवल्याचा दावा केला जात होता. या प्रकरणामध्ये मागील पाच दिवसांमध्ये पोलिसांकडून कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने सांगोल्यातील नागरिकांबरोबरच डॉक्टरांनाही सोशल मीडियावरुन मोहीम सुरु केली होती. ऋचाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याची चर्चा संपूर्ण सांगोल्यात मागील काही दिवसांपासून रंगल्याचं पाहायला मिळालं. जनतेचा दबाव वाढत असल्याचं पाहून आज सकाळी पोलिसांनी ऋचाच्या सासऱ्यांना अटक केली. 

आई आणि भावाचा गंभीर आरोप

सांगोला तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या भाऊसाहेब रुपनर यांचा मुलगा डॉक्टर सुरजचा विवाह 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 मध्ये पंढरपुरमधील प्रतिष्ठित दिवंगत डॉ. संजय पाटील यांची मुलगी ऋचा झाला होता. सुरज आणि ऋचा यांना दोन मुलंही झाली. मात्र सुरज आणि ऋचा या दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. सुरजच्या बाहेरख्यालीपणामुळे या दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते. ऋचाने सुरजच्या अनेक भानगडी उघड केल्या. ऋचाने सुरजच्या या साऱ्या प्रकरणांबद्दल कुटुंबाला माहिती दिली. मात्र या गोष्टीचा राग मनात ठेऊन पती सुरज ऋचाला वारंवार मारहाण करीत असल्याचा आरोप तिची आई सुनीता पाटील तसेच भाऊ ऋषिकेश यांनी केला आहे. सुरजच्या व्याभिचारी वागणुकीला आणि सातत्याने दिल्या जाणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून ऋचाने आत्महत्या केली, असं तिच्या सासरच्यांचं म्हणणं आहे.

ऋचाचा पती डॉक्टर सुरज रुपनर

एमआरआय मशिनसाठी आणला जात होता दबाव

सुरज आणि ऋचा हे दोघे फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज वसाहतीत वास्तव्यास होते. पेशाने डॉक्टर असलेले दोघेही एमडी रेडिओलॉजिस्ट होते. दोघांचे पंढरपूरमध्ये एक हॉस्पिटल आहे. दिवंगत वडिलांनी घेतलेला शहरातील अतिशय मोक्याचा भूखंड ऋचाच्या नावावर आहे. या भूखंडावर कर्ज काढून देण्यासाठी सुरज पत्नीवर दबाव टाकत होता. आपल्या हॉस्पिटलसाठी एमआरआय मशीन घेण्यासाठी कर्ज काढून पैसे देण्यासाठी सुरजने पत्नीमागे तगादा लावला होता. यासाठी सुरज पत्नीला वारंवार त्रास देत होता. तिचा छळही केला जात होता.

अटक करण्यात आलेले शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब रुपनर

भावाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे सासऱ्यांना अटक

सुरजकडून होणाऱ्या त्रासाला ऋचा कंटाळली होती. मात्र वडिलांनी नावावर केलेल्या भूखंडावर कर्ज काढणार नाही असं ऋचाने स्पष्ट केलं होतं. ऋचाने कर्ज काढण्यास नकार दिल्याने सुरजकडून तिला देणारा त्रास वाढत गेला. यातच मानसिक दबावातून ऋचाने आत्महत्या केली असं पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या लेखी गुन्ह्यामध्ये नोंदवलेलं आहे. ऋचाचा भाऊ ऋषिकेश पाटीलने सांगोला पोलिस ठाण्यात या प्रकरणामध्य ऋचाच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच तक्रारीच्या आधारे आता ऋचाच्या सासऱ्यांना अटक केली आहे. आता भाऊसाहेब रुपनर यांच्याकडून सुरजची माहिती काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगितलं जात आहे.