Pankaja Munde Dasara Melava 2023: भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा यंदाही भगवान भक्तीगडावर पार पडणाराय... या मेळाव्यात पंकजा मुंडे नेमकी काय राजकीय भूमिका मांडणार? मराठा आणि ओबीसी वादात नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे... भाजपच्या राष्ट्रीय सचिव... सालाबादप्रमाणं यंदाही पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावर आयोजित करण्यात आलाय.
पंकजा मुंडेंना भाजपमध्ये डावललं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत. मात्र, मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असतानाही पंकजा या आखाड्यापासून दूर आहेत.त्यातच केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे मनातली खदखद व्यक्त करणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. अशा वेळी ओबीसींच्या हितरक्षणासाठी पंकजा मुंडे काय भूमिका घेतात, याकडंही सर्वांचं लक्ष असणार आहे. पंकजा मुंडेंनी अलिकडेच शिवशक्ति परिक्रमा यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात दौरे केले. आपल्या समर्थकांशी आणि हिंतचिंतकांशी संवाद साधला. या संवादातून नेमकं काय हाती लागलं, याचा उलगडा पंकजांच्या भाषणातून होईल, अशी अपेक्षा आहे.
सध्या राजकीय अस्तित्वासाठी पंकजा मुंडेंची धडपड सुरू आहे. अशावेळी त्या नेमकी काय राजकीय दिशा स्पष्ट करणार? मराठा आरक्षणावरून सरकारची कोंडी झाली असताना त्या नेमकी काय भूमिका मांडणार? याची उत्सूकता मुंडे समर्थकांसह सगळ्यांनाच आहे.
मविआचं मराठवाड्यातल्या जागावाटपाचं सूत्र ठरल्याचं कळतंय. ठाकरे गट, शऱद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस मराठवाड्यातल्या आठ लोकसभा निवडणुका लढवणार आहेत. यामध्ये बीड आणि हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गट, नांदेड आणि लातूर काँग्रेस, तर परभणी, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जागा ठाकरे गट लढवणार आहे. फक्त जालना लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बोलणी सुरू आहे. जालन्याच्या जागेवरून बीडबाबतही बदल होईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.