प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, अकोला : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा गुन्हा नोंदवण्यात आला. ऍट्रोसिटी कायद्याच्या विविध 22 कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या भीमराव घाडगे यांनी 20 एप्रिलला परमबीरसिंह यांच्याविरोधात राज्य सरकार आणि वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मध्यरात्री परमबीरसिंह यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
परमबीर सिंह यांच्याकडे ठाणे पोलीस आयुक्ताचा पदभार असताना त्यांनी हजारो कोटींचा भ्रष्ट्राचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केली आहे. संबधित तक्रार घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. परमबीर सिंह यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांवर भीमराव घाडगे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्याविरूद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच अकोला येथील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये झिरो एफआयआर करुन हे प्रकरण आता ठाणे येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात परमबीर सिंग यांना कधीही अटक होवू शकते.