konkan Railway News in Marathi : होळी किंवा गणपती हे दोन सण सुरु होण्यापूर्वी कोकणवासिंयाची कोकणात जाण्यासाठी लगबग सुरु होते. त्यातच आता येत्या काही दिवसात होळी, शिंमगा सण येतो, हा उत्सव साजरा करण्यासाठी कोकणात कितीही गाड्या सोडल्यातरी त्या गाड्या तुडूंब भरुन जातात. तर दुसरीकडे कोकण रेल्वेमार्गावरील दोन पॅसेंजर ट्रेन या सर्वसामान्यांच्या खिशाला पडवणारे आहेत तसेच या पॅसेंजर कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर थांबा घेत जात. त्यामुळे या दोन पॅसेंजर ट्रेनला प्रवाशांची प्रचंड गर्दी होते.
याचपार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सावंतवाडी-दिवा आणि रत्नागिरी-दिवा या दोन पॅसेंजर ट्रेन दादर किंवा सीएसएमटी स्थानकापर्यंत चालवा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे. यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करूनही रेल्वेकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी दोन्ही गाड्यांची सेवा दादर किंवा सीएमटी स्थानकापर्यंत चालवण्याची विनंती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली आहे. या मागणीनंतर तरी दोन्ही पॅसेंजर ट्रेन सुरु होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान गाडी क्रमांक 50103/50104 रत्नागिरी दादर-रत्नागिरी पॅसेंजर प्रवासी वेळेत बचत करण्यासाठी ‘झिरो बेस्ड टाइम टेबल’ राबवण्यात आले. या वेळापत्रकानुसार दादरवरून सुटणारी पॅसेंजर ट्रेन ही दिव्यावरून चावविण्यात येत आहे. तसेच सावंतवाडी-दिवा ही रेल्वेगाडीही दादर वा ‘सीएसएमटी’वरून सुटत नसल्याने मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरातील तसेच वसई-विरार येथील प्रवाशांना कोकणात जायचं म्हटलं तर मुंबईला संपूर्ण वळसा घालून दिवा गाठवं लागतं.
दिवा जंक्शनवर मूळ गाड्या हाताळण्यासाठी सुविधांचा अभाव आहे. पाणी, स्वच्छता, काळजी सुविधा आदी गैरसोयींमुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे दादर किंवा सीएसएमटी स्थानकापर्यंत दोन्ही गाड्या वाढवण्याबाबत कोकण विकास समितीकडे पत्रव्यवहार करूनही योग्य ती कार्यवाही झाली नाही. या पार्श्वभूमीवर कोकण विकास समितीने मध्य रेल्वेमंत्र्यांना लेखी निवेदनाद्वारे सेवा विस्ताराबाबत सूचना केल्या आहेत. दादर आणि ठाणे हे रेल्वेचे प्रमुख केंद्र असल्याने प्रवाशांसाठी ते अधिक सोयीचे होईल, अशी अपेक्षा आहे. संपूर्ण मुंबईतील प्रवाशांना या दोन रेल्वेगाड्या खूप महत्त्वाच्या आणि सोयीच्या आहेत. त्यामुळे त्यांचे दिव्याऐवजी सीएसएमटीपर्यंत विस्तारीकरण केल्यास प्रवाशांना खूप फायदेशीर ठरेल.