पंतगराव कदम यांच्यावर सांगलीत होणार अंत्यसंस्कार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी मुंबईत लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.  उद्या शनिवारी संध्याकाळी ४ वाजता सांगलीतील वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 9, 2018, 11:37 PM IST
पंतगराव कदम यांच्यावर सांगलीत होणार अंत्यसंस्कार title=

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी मुंबईत लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.  उद्या शनिवारी संध्याकाळी ४ वाजता सांगलीतील वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

अनेक दिवसांपासून आजारी

पतंगराव कदम गेल्या काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होते. त्यासाठी त्यांना ३ मार्च रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना अधिक उपचारासाठी अमेरिकेत हलविण्यात येणार होते, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. 

यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं

आजच काँग्रेस नेत्या आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन पतंगराव कदम यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली होती. पतंगरावांच्या निधनाने काँग्रेसचे आणि महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

विविध खात्यांची मंत्रिपद 

पतंगराव कदम यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात त्यांनी अनेक वर्ष राज्यात मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. पतंगराव कदम हे सांगली जिल्ह्यातल्या पलूस - कडेगावचे आमदार होते. काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी अनेक वर्ष राज्यात महसूल, मदत आणि पुनर्वसन, उद्योग, सहकार, वन, शिक्षण, या सारख्या विविध खात्यांचं मंत्रिपद म्हणून काम  पाहिले आहे. ते कॉंग्रेसचे जेष्ठ आणि ताकतवान नेते म्हणून  त्यांची  ओळख  आहे.

 शेतकरी कुटुंबात जन्म

१९४५ मध्ये सांगली जिल्ह्यातील सोनसळ येथे एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगराव कदम यांचा जन्म झाला. प्रेमळ मनाचा आणि दिलदार स्वभावाचा नेता अशी त्यांची ओळख, मंत्री पदावर असताना, कोणत्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता आला तरी त्याचे काम करणे, भेटायला आलेल्या सर्व लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन तात्काळ त्यांना मदत करणे, तातडीने निर्णय घेणे अशी त्यांची कामाची पद्धत. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि माजी मंत्री स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांचे कदम हे निकटवर्तीय होते.