शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : गांजा प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या ४ पोलिसांवर ६० ते ७० वऱ्हाडींनी मिळून हल्ला केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बुऱ्हाण नगर मळवटी परिसरात गांजाच्या एका प्रकरणातील आरोपी मस्तान मुबारक शेख येणार असल्याची माहिती मिळाली होती.
गेल्या अनेक महिन्यांपासून मस्तान शेख हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. त्यानुसार विवेकानंद पोलीस ठाण्यातील राम गवारे, प्रकाश भोसले, युसूफ शेख आणि रामहरी भोसले हे ४ पोलीस कर्मचारी हे साध्या वेशात लग्न मंडपापासून काही अंतरावर येऊन सापळा रचला. काही वेळात लग्नसोहळा आटोपून आरोपी मस्तान शेख हा एका पान टपरीजवळ आला असताना पोलिसांनी त्याला पकडलं. मात्र पोलिसांनी आपल्याला पकडल्याचे लक्षात येताच आरोपी मस्तान मुबारक शेख याने आरडाओरड सुरु केला. त्यावेळी हाकेच्या अंतरावरील लग्न सोहळ्यातील वऱ्हाडी मंडळींनी येऊन राम गवारे, प्रकाश भोसले, युसूफ शेख आणि रामहरी भोसले यांच्यावर हल्ला केला.
६० ते ७० जणांच्या या जमावाने यावेळी जबर मारहाण करीत दगडफेकही केली. या हल्ल्यात चारही पोलीस जखमी झाले असून ज्यात युसूफ शेख आणि प्रकाश भोसले यांना जबर मार लागला आहे. उपचारासाठी जखमी पोलिसांना लातूरच्या शासकीय सर्वोपचार दाखल केलं आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस बंदोबस्त मागवून पोलिसांनी २५ ते ३० जणांना काही वेळानंतर ताब्यात घेतलं असून याप्रकरणी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.