Nagpur-Pune Flight: बोर्डिंग गेटवरच पायलटचा मृत्यू झाला आहे. नागपूर विमानतळावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत वैमानिक नागपूरहुन पुण्याला इंडिगो कंपनीचे विमान घेऊन जाण्यासाठी सज्ज होते. मात्र,विमानात बोर्ड होण्यापूर्वीचं ते बोर्डिंग गेट जवळ कोसळले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे विमानतळावर काही काळ तणावाचे वातावरण होते.
कॅप्टन मनोज सुब्रमनियम अस मृत पायलटचे नाव आहे. मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पोस्ट मोर्टेम नंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
सुब्रमनियम यांनी बुधवारी त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर या अशा दोन सत्रात उड्डाण केले. पहाटे 3 ते 7 या दरम्यान त्यांनी हे उड्डाण केले. त्यानंतर त्यांनी 27 तास विश्रांती घेतली. यांनतर आज ते नागपूर पुणे असे उड्डाण भरणार होते. डुयुटीवर जात असतानाच ते बोर्डिंग गेटवरच अचानक कोसळले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने सुब्रमनियम यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
जो वैमानिक विमान घेऊन उड्डाण करणार होता त्याचाच मृत्यू झाल्यामुळे विमानतळावर गोंधळ उडाला. अखेरीस नियोजीत वेळा पेक्षा 15 ते 20 मिनीट उशीराने या विमानाने उड्डाण केले. इंडिगो एयलाईन्सने शोक व्यक्त केला आहे. तसेच कुटुंबियांच्या दुख:त सहभागी असल्याचे सांगितले.
आठवड्याभरात 3 वैमानिकांच्या आकस्मिक मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मृतांमध्ये दोन भारतीय वैमानिकांचा समावेश आहे. बुधवारी कतार एअरवेजच्या वरिष्ठ पायलटचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. वैमानिक दिल्लीहून दोहाला उड्डाण करत असताना विमानातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मात्र, वैद्यकीय आणीबाणीनंतर विमान दुबईकडे वळवण्यात आले.
विमान हवेत उड्डाण करत असतानाच वैमानिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. LATAM एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर कॅप्टन Ivan Andaur यांचा मृत्यू झाला. विमान हवेत उड्डाण करत असतानाच वैमानिकाची प्रकृती बिघडली. यानंतर विमानाचं तात्काळ पनामा स्थानकावर लँडिंग करण्यात आलं.