ED Arrest Sujit Patkar: कोविड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. जंबो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी सक्तवसुली संचलनालयाने सुजित पाटणकर यांना अटक केली. दरम्यान, न्यायालयात हजर केलं असता त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
याआधी 20 जुलैला कोविड घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली होती. त्यांच्यासह आणखी एका डॉक्टरलाही अटक करण्यात आली होती. संजय राऊतांच्या मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवले, असा आरोप त्यांनी केला होता.
ईडीने सुजित पाटकर आणि डॉ किशोर बिसुरे यांना अटक केली होती. किशोर बिसुरे हे बीएमसीचे डॉक्टर आहेत, तसंच दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचे डीन होते. दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचा करार सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटशी करण्यात आला होता अशी माहिती आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून सुजीत पाटकर यांना ओळखलं जातं. सांताक्रूझ पूर्व वाकोला येथील सुमित अरिस्ता बिल्डिंगच्या सी विंगमध्ये त्यांचं निवासस्थान आहे. 21 जूनला ईडीने त्यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. अधिकाऱ्यांचं एक पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं. सुमारे 3 तास ही छापेमारी सुरु होती. यानंतर किरीट सोमय्या यांनीही त्यांना उत्तर द्यावं लागेल अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली होती.
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं. ईडीने मुंबईत 15 ठिकाणी छापे टाकले होते. दरम्यान संजय राऊतांनी सुजीत पाटकर हे माझे फक्त मित्र असल्याचं सांगितलं होतं. ईडीला सुजीत पाटकरांच्या घरी अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्रं मिळाली होती. या व्यवहारात सुजीत पाटकरांची पत्नी आणि वर्षा राऊत यांचं नाव होतं.