पिंपरी चिंचवड : चंपाला पवार कुटुंबियांशिवाय दिसतं कोण?, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पावर यांनी केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. चंपा हा चंद्रकांत पाटील यांचा शॉर्टफॉर्म आहे, जसा माझा शॉर्टफॉर्म अप आहे, असं अजितदादा म्हणाले. भविष्यात पवार कुटुंबातले तरुणही भाजपमध्ये येऊ शकतील, आले तर त्यांचं स्वागत करु, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर अजितदादांनी निशाणा साधला.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सरकार आलं तर ५ रुपयात जेवण देऊ आणि १ रुपयात आरोग्य तपासणी करु, अशी घोषणा केली होती. मग ५ वर्ष काय झोपला होतात का? असा सवाल अजित पवारांनी विचारला. तसंच माणूस भावनिक होतो, पण मी लगेच सावरलो. अजित पवार रडणारा आणि पळून जाणारा माणूस नाही, असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिली. अजित पवारांचे अश्रू मगरीचे असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं.
लोकसभा निवडणुकीनंतर पार्थ पवार पिंपरी चिंचवड मध्ये दिसले नाहीत, ते प्रचाराला येणार का? असा प्रश्न विचारला असताना तो येणार नाही, मी सांगतो म्हणून तो येणार नाही, मी त्याचा बाप आहे, असे अजित पवार म्हणाले.
राज्यात आघाडीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे, आघाडीला राज्यात १७५ पेक्षा अधिक जागा मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या जागा निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल असं अजित पवार यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड सह काही ठिकाणी ए बी फॉर्मचा घोळ झाला, त्यामुळे आम्ही अपक्षांना पाठिंबा दिला. निवडून आल्यावर आघाडीसोबत राहू अशी हमी त्यांनी दिल्याचा दावाही अजित पवार यांनी केला.