उद्धव ठाकरेंना टोला, पाच वर्षे काय झोपला होता? - अजित पवार

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

Updated: Oct 9, 2019, 07:27 PM IST
उद्धव ठाकरेंना टोला, पाच वर्षे काय झोपला होता? - अजित पवार title=
संग्रहित छाया

पुणे : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर दसरा मेळाव्यात हल्लाबोल केला होता. याला अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या लोकांना राष्ट्रवादीशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. आता म्हणे दहा रुपयांत जेवण आणि एका रुपयात आरोग्य तपासणी करणार. मग पाच वर्षे काय झोपला होता का, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

उद्धव हे भावनिक झाल्याच्या मुद्द्यावर बोलताना मगरीचे अश्रू, असे ते म्हणालेत. त्यांना शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशिवाय दुसरे काय दिसते. भावनिक विषयावर ते म्हणालेत, माणूस हा कधीतरी भावनिक होतो. पण मी लगेच सावरलो. अजित पवार रडणारा आणि पळून जाणारा माणूस नाही, असे ते म्हणालेत.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना, 'चम्पा'ला पवार कुटुंबीयांशिवाय दिसते कोण?, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात आघाडीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे, आघाडीला राज्यात १७५ पेक्षा अधिक जागा मिळणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. १७५ पेक्षा अधिक जागा निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल, असे अजित पवार म्हणाले.  

अनुच्छेद ३७० रद्द केल्याचा मुद्दा या निवडणुकीत होण्याचा प्रश्नच नाही. पिंपरी-चिंचवडसह काही ठिकाणी एबी फॉर्मचा घोळ झाला. त्यामुळे आम्ही अपक्षांना पाठिंबा दिला आहे. निवडून आल्यानंतर या उमेदवारांनी आघाडीबरोबर राहण्याची हमी दिल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.