PM Modi Oath Ceremony: आज शपथविधी सोहळा पार पडणार असताना राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) एकही जागा मंत्रीपद मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यादरम्यान प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांचं नाव फायनल केलं होतं पण त्यांनी राज्यमंत्रीपद नाकारलं असा खुलासा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी स्वत: राज्यमंत्रीपद स्विकारण्यासाठी नकार का दिला याचा खुलासा केला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
"माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता. मी याआधी कॅबिनेट मंत्रीपदावर राहिलो आहे. त्यामुळे स्वतंत्र प्रभार घेणं मला योग्य वाटत नव्हतं. त्याच्यात काही भाजपाच्या श्रेष्ठींची चूक आहे असं काही नाही. त्यांना मित्रपक्षांना सोबत घेऊन निर्णय घ्यायचा आसतो. महाराष्ट्रातून शिवसेना पक्षाचे 7 खासदार निवडून आले. त्यांना ज्या काही सूचना मिळाल्या त्याच अनुषंगाने आम्हालाही सूचना देण्यत आल्या. आम्हाला धीर धरा, थोडे दिवस वाट पाहा असं सांगण्यात आलं आहे," असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.
पुढे ते म्हणाले की, "आम्हाला आज जे काही मिळत आहे ते याआधी कॅबिनेट मंत्रीपदी राहिल्याने स्विकारणं थोडं योग्य वाटत नाही असं सांगितलं आहे. त्यावर त्यांनी थोडे दिवस धीर धरा असं सांगितलं आहे. याचा अर्थ त्यांनी नाकारलं असं नाही. आमच्या पक्षात तटकरे विरुद्ध पटेल असा काही वाद नाही. माझ्या नावाचा निर्णय पक्षाने एकमताने घेतला होता. केंद्रात संधी मिळेल तेव्हा प्रफुल्ल पटेल यांना पाठवावं असं ठरलं होतं. त्यामुळे वादाचा विषयच नाही. थोडे दिवस थांबा, धीर ठेवा असंही सांगण्यात आलं आहे. याचा अर्थ उद्याच करणार असा नाही. काही दिवसांनी विचार होणार असेल त्यामुळेच त्यांनी असं सांगितलं असे. मी काही तारीख देऊ शकत नाही, मी ज्योतीषतज्ज्ञ नाही".
"एक मोठा पक्ष सहकारी पक्षांसोबत चर्चा करत असतो तेव्हा पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्याशिवाय असा सूचना कऱणार नाहीत. आम्हाला नाकारलं होतं, द्यायची तयारी नव्हती असं काही नव्हतं. हे घ्या अन्यथा काहीच घेऊ नका असं सांगण्यात आलेलं नाही. आम्ही थोडे दिवस धीर ठेवू. सर्वांना एकमेकांची गरज आहे. आगामी निवडणुकीत आम्हाला एकत्र लढायचं आहे," असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.