पंतप्रधान मोदींनी राफेलप्रकरणी चौकशीला सामोरे जावे- शरद पवार

शरद पवारांचे घुमजाव

Updated: Oct 1, 2018, 04:28 PM IST
पंतप्रधान मोदींनी राफेलप्रकरणी चौकशीला सामोरे जावे- शरद पवार title=

बीड: राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय चौकशीला सामोरे जावे, असे नवे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून शरद पवारांनी मोदींचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. विरोधकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी पवारांच्या या वक्तव्यानंतर पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. 

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बीडमधील सभेत पवारांनी स्पष्टीकरण दिले. राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी मी कोणाचेही समर्थन केले नव्हते. राफेल व्यवहारात गोलमाल झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारने याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीला सामोरे गेले पाहिजे. विमानांची किंमत एवढी का वाढली, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले पाहिजे, अशी मागणी यावेळी पवारांनी केली. 

तसेच भाजपकडून देण्यात येणारी आश्वासने म्हणजे लबाडाघरचं आवतण असल्याची टीकाही त्यांनी केली. सीमारेषेवर दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद होत असताना शांत बसून राहणारे हे सरकार नेभळट आहे. तसेच महागाई वाढवणाऱ्या या सरकारला पुन्हा सत्तेत आणू नका, असेही पवारांनी सांगितले.