पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातल्या या भागाला देणार भेट

'नागरिकांनी पाण्याची बाटली किंवा महिलांनी पर्स किंवा इतर जड वस्तू आणू नये'

Updated: Jan 9, 2019, 08:43 AM IST
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातल्या या भागाला देणार भेट title=

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी अकरा वाजता पंतप्रधान सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सभा घेणार आहेत. सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत आजवर झालेल्या कामाचं उद्घाटन पंतप्रधान करतील. त्याचबरोबर माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या ३० हजार असंघटित कामगारांच्या घरकुलांची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सोलापूर-उस्मानाबाद-येडशी महामार्गाचं लोकार्पणदेखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल. 

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्वत: पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या तयारीची पाहणी केली. पंतप्रधानांच्या सभेसाठी जास्तीत जास्त प्रमाणात जनता गोळा होईल, याची भाजप नेते काळजी घेत आहेत. पार्क मैदानावर मंडप बांधून खाली जमिनीवर कार्पेटही टाकण्यात येणार आहे. मैदानावर २० हजार खुर्च्यांची सोय करण्यात आलीय. गॅलरीतही नागरिकांसाठी बसण्याची सोय करण्यात आलीय. 

उल्लेखनीय म्हणजे, मोदींच्या सभेआधी विमानतळ ते पार्क मैदानापर्यंत रस्त्याची तातडीनं दुरुस्तीही करण्यात आलीय. विमानतळ ते सात रस्त्यापर्यंत रस्ता दुभाजकांमध्ये झाडं लावण्याचं कामही पूर्ण झालंय. 

पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक सुरक्षा तैनात करण्यात आलीय. याचाच भाग म्हणून नागरिकांनी पाण्याची बाटली किंवा महिलांनी पर्स किंवा इतर जड वस्तू आणू नये, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. 

पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरिदीपसिंग पुरी यांच्यासह स्थानिक मंत्री व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.