यवतमाळ : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःची आर्थिक उन्नती साधणाऱ्या संघर्षशील महिलांशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट संवाद साधणार आहे. यवतमाळच्या पांढरकवडा येथे पंतप्रधानांची सभा होणार असून ते महिला मेळाव्याला संबोधित करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यादृष्टीने मतदारसंघात आयोजित होत असलेल्या या महिला मेळाव्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आढावा घेणे सुरू केले आहे.
काँग्रेसने निवडणुकीपूर्वी प्रियंका गांधी-वाड्रा यांचं कार्ड खेळल्यानंतर महिला मतदारांवर लक्ष ठेऊन भाजपने १६ फेब्रुवारीला या महिला मेळाव्याचं आयोजन केलं आहे. आज मुख्यमंत्र्यांसोबत हंसराज अहीर, पालकमंत्री मदन येरावार आणि प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
दुसरीकडे, काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वाड्राही पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या जाहीर दौऱ्यावर असणार आहेत. १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान वाराणसी, फैजाबाद, आजमगड, गोरखपूर, बलिया, फूलपूर, जौनपूर याठिकाणी एकुण चाळीस बैठका त्या घेणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधीही असतील. या... नव्या राजकारणाची सुरुवात करुया, असं म्हणत प्रियांका गांधींनी मतदारांना साद घातलीय.