योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरात नागरी हक्क संरक्षण दलाचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांना निलंबीत करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिलेत. आर्थिक फसवणूक प्रकरणी प्राथमिक चौकशीत ते दोषी आढळल्याने लोहार यांना निलंबीत करण्यात आलंय.
मनोज लोहार... महाराष्ट्र पोलीस दलातले उच्च पदस्थ अधिकारी... मात्र आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालीय. जळगाव जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक असताना मनोज लोहार यांनी खंडणी मागितल्याची तक्रार डॉ. उत्तमराव महाजन यांनी केली होती. खंडणीचे २५ लाख आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी २१ लाखांची मागणी करण्यासाठी लोहार यांच्या कार्यालयात डांबूनही ठेवण्याचा आल्याचा आरोप महाजन यांनी केलाय.
तत्कालीन विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा विधानसभेत नेला होता... अखेर लोहार यांचं त्यावेळी निलंबन झालं होतं. मात्र पुन्हा एकदा त्यांना नाशिक विभागाच्या पाच जिल्ह्यांसाठी नागरी संरक्षण दलाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्त कऱण्यात आलं. तिथेही त्यांच्यावर खंडणीबाजीच्या तक्रारी दाखल झाल्या. अखेर प्राथमिक चौकशीत लोहार दोषी आढळले आणि त्यांना निलंबीत कऱण्यात आलं.
लोहार कुटुंबीय नेहमीच भ्रष्ट कारभारामुळे चर्चेत राहिलंय. लोहार यांचे वडील आणि भाऊही पोलीस दलात उच्च अधिकारी म्हणून कार्यरत होते. मनोज लोहार यांच्यावर केसेस दाखल असताना आणि न्यायालयात गंभीर खटला सुरू असताना त्यांना सेवेत कोणी घेतले याची चौकशीही होणं गरजेचं आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अधिका-यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्रालयातल्या अधिका-यांचा पर्दाफाश होणं गरजेचं आहे.